राज्यात जातीपातीवरून राजकारण तापलंय. मराठा-ओबीसीनंतर आता बंजारा-वंजारा समाजाकडून आरक्षणाची मागणी केली जातेय. त्याच दरम्यान अजित पवार यांनी आगामी निवडणुकांवरून जाती-पातीचा उल्लेख करून मोठं विधान केलं आहे. अजित पवार यांनी आपला पक्ष सर्वसमावेश असल्याचं पुन्हा एकादा स्पष्ट केलं आहे. आगामी निवडणुकांसाठी कोणत्याच समाजघटकाला डावळलं जाणार नाही, असं विधान उपमुख्यमंत्री यांनी केलं आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा पुढे ढकलल्या गेल्या आहेत. याच दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडणुकांसाठी तिकीट वाटपाबबात मोठं विधान केलं आहे. ” येत्या निवडणुकांचे तिकीट द्यायचे आपल्या हातात आहे. आपल्याला दिल्लीत जाऊन विचारायची गरज नाही. गेली चार वर्षे निवडणूक लांबली होती. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत निवडणुका घ्या असे म्हटले होते मात्र आम्हाला त्यात हस्तक्षेप करता येत नाही. ३१ जानेवारी २०२६ पर्यंत निवडणूक संपवून निकाल लावायचा. असे सुप्रीम कोर्टाने आदेश दिले आहे. निवडणुकीचे तिकीट देताना जातीपाती वा नातेगोत्याचा विचार होणार नाही. कोणत्याही समाजघटकाला वगळले जाणार नाही आणि सर्वांना न्याय दिला जाईल.” असे अजित पवार आपल्या भाषणात म्हणाले.
अजित पवार यांनी राज्यातील सध्याच्या परिस्थितीवरही भाष्य केले. “मराठवाड्यासह जालना, बीड, नांदेड आदी जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत कॅबिनेट बैठकीत निर्णय घेण्यात आला असून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. मी कॅबिनेटमध्ये सूचनाही केली आहे की, दसऱ्यापर्यंत शेतकऱ्यांना आर्थिक मदत पोहोचली पाहिजे. अहवाल तातडीने तयार करून शेतकऱ्यांच्या नावासह शासनाला पाठवावा आणि थेट त्यांच्या खात्यावर मदत जमा केली जाईल.”
कांद्याच्या घसरलेल्या भावामुळे निर्माण झालेल्या संकटावर सरकार उपाययोजना करत असल्याचेही पवारांनी नमूद यावेळी केले. महायुतीचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. संकटावर मात करण्यासाठी सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. त्यानंतर बोलताना अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले.


