पुण्यात अधिकाऱ्याने मागितली 8 कोटींची लाच, दोघे एसीबीच्या सापळ्यात; 30 लाखांचा हफ्ता घेताना रंगेहाथ पकडलं
पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कोट्यवधींची लाच मागताना 2 जणांना रंगेहात पकडले आहे. 5 डिसेंबर रोजी सापळा लावून विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली आहे.
पुणे: पुण्यातील एका सहकारी संस्थेच्या सभासदांकडे आठ कोटीची लाच मागून पहिला हप्ता म्हणून तीस लाख रुपये स्वीकारणाऱ्या लिक्विडेटर आणि ऑडिटरला रंगेहात अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या या कारवाईमध्ये सहकार विभागातील लिक्विडेटर विनोद देशमुख आणि ऑडिटर भास्कर पोळ यांना अटक करण्यात आली आहे. पुण्यातील धनकवडी भागात एकता सहकारी संस्था आहे. या संस्थेच्या मालकीची पुण्यात जागा आहे. २००५ साली स्थापन झालेल्या या संस्थेचे ३२ सभासद आहेत. मात्र २०२० साली सभासदांमध्ये वाद झाल्याने प्रकरण सहकार विभागाकडे गेलं आणि २०२४ साली या संस्थेवर विनोद देशमुख यांची लिक्विडेटर म्हणून नेमणूक करण्यात आली होती. देशमुख यांनी या संस्थेच्या ३२ सभासदांना शेअर सर्टिफिकेट हवं असेल तर तीन कोटी रुपयांची लाच मागितली. त्याचबरोबर संस्थेची जागा विक्री करण्यासाठी परवानगी हवी असेल तर आणखी पाच कोटींची मागणी करण्यात आली. त्यापैकी तीस लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना विनोद देशमुख आणि भास्कर पोळ यांना शनिवार पेठेतील एका कार्यालयासमोर रंगे हात अटक करण्यात आली आहे. पुणे विभागातील सहकारी संस्थांच्या लिक्विडेशन प्रक्रियेत एवढ्या प्रचंड रकमेची लाच मागितल्याची ही पहिलीच घटना मानली जात आहे


