ट्रेकॅम्पने दिव्यांगांना घडविली गर्भगिरी डोंगराची सफर…
अनामप्रेमच्या कलाकारांनी केली निसर्गप्रेमींची सकाळ भक्तिमय…!
अहिल्यानगर (प्रतिनिधी) – पहाटेची वेळ… निसर्गरम्य डोंगर परिसर… हवेत गारवा आणि कानात पडणारा वाद्यांचा निनाद अन सुमधूर भजनांचा आवाज… त्यामुळे तृप्त झालेले रसिक पर्यटनप्रेमी… निमित्त होते ट्रेकॅम्पने अनामप्रेम संस्थेच्या दृष्टीहिन विद्यार्थ्यांसह आयोजित केलेल्या गर्भगिरी महादेव मंदिर परिसरातील ट्रेकचे. अनामप्रेमच्या कलाकारांनी भल्या सकाळी रंगवलेल्या संगीत मैफलीत उपस्थित निसर्गप्रेमी अक्षरशः मंत्रमुग्ध झाले होते.
गर्भगिरी डोंगररांगेत नगरपासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर गर्भगिरीचा महादेव हे पुरातन छोटेसे दगडी मंदीर आहे. ट्रेकॅम्पचे संस्थापक विशाल लाहोटी यांच्या संकल्पनेतून या वेळी या मंदिर परिसरातील टेकडीवर ट्रेकचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, यंदाच्या ट्रेकचे वेगळे वैशिष्ट्य होते. अंधांसाठी काम करणार्या अनामप्रेम संस्थेच्या 30 दृष्टीहिन विद्यार्थ्यांना सोबत घेण्यात आले होते. भल्या पहाटे 250 निसर्गप्रेमी नगरकर व अनामप्रेमचे 30 विद्यार्थी चांदबिबी महाल घाटात पोहोचले. डोंगरावरील सपाट जागेवर सर्वांनी शारीरिक कसरती केल्या. एक वेगळीच अनुभूती मिळालेल्या अनामप्रेमच्या विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर कमालीचा आनंद दिसत होतो. त्यानंतर ट्रेक घडवून आणण्याचे आव्हान ट्रेकॅम्पच्या सदस्यांवर होते. ते त्यांनी व्यवस्थित पार पाडले.
गर्भगिरीच्या महादेव मंदिर परिसरात पोहोचल्यानंतर सर्वांनी मनोभावे दर्शन घेतले. नंतर अनामप्रेमच्या सौदागर लोंढे, द्वारका जोरावर, श्रद्धा काटे, राधा यादव, काजल असवले, अमर सोमवंशी, प्रकाश धुंदकर, राहुल पेटारे आदी वादक-गायकांनी डॉ. मेघना मराठे, अभय रायकवाड, सुरेखा राठोड, अमृत भुसारी, राहुल खिरोडे यांच्या मार्गदर्शनाखाली मैफल चांगलीच रंगवली. त्यांनी तबला, पेटी, खंजिरी, चायना ब्लॉक, टाळ या वाद्यांच्या साथीने सुमधूर भजने सादर केली. या कलाविष्काराने मंत्रमुग्ध झालेल्या रसिकांनी टाळ्यांच्या गजरात त्याचे स्वागत केले. राहुल पेटारे या विद्यार्थ्याने एका हाताने टाळी वाजवून दाखविली. त्यामुळे उपस्थित सर्वचजण अचंबित झाले. राजू भगत यांनी संस्थेची माहिती दिली. अनामप्रेमच्या विद्यार्थिनींचे हेअर कट मोफत करून देण्याची इच्छा ट्रेकॅम्पच्या सदस्या आणि सामाजिक कार्यकर्त्या शितल दळवी यांनी या वेळी व्यक्त केली. स्वादिष्ट भेळ आणि गरम कॉफीचा आस्वाद घेतल्यानंतर या विद्यार्थ्यांना व्यवस्थित गाडीपर्यंत सोडण्यात आले. या दिव्यांगांना ट्रेक घडवून आणल्याचे समाधान अनेक ट्रेकरच्या चेहर्यावर होते, तर काहीजणांच्या डोळ्यात सहानुभूतीचे अश्रू होते. एका वेगळ्या ट्रेकचा अनुभव सर्वांनी घेतला.
—
ट्रेकर बनले ‘त्यांचे’ डोळे…
ट्रेकला आलेल्या अनामप्रेमच्या प्रत्येक विद्यार्थ्याची जबाबदारी एका-एका ट्रेकरने घेतली. त्यांना व्यवस्थित हाताला धरून डोंगरावरील भटकंती सुरू झाली. आपल्या आजूबाजूला डोंगर आहे, एकीकडे दरी आहे, पवनचक्की आहे, गवत वाळलेले आहे असे विविध वर्णन विद्यार्थ्यांना ऐकवले जात होते. जणू ट्रेकर त्या विद्यार्थ्यांचे डोळेच बनले होते. त्यामुळे निसर्गाचा परिपूर्ण आनंद या विद्यार्थ्यांनी घेतला.


