अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी आज देशव्यापी संप पुकारला आहे. या संपामुळे देशभरातील अंगणवाडी केंद्रांना आज टाळे लागले आहे. आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी पोषण ट्रॅकर ॲप बंद ठेवत कर्मचाऱ्यांनी डिजिटल बहिष्कार टाकला आहे. परंतु, या लढ्यात एक विदारक दृश्य पाहायला मिळाले.
अंगणवाडी सेविकांनी त्यांच्या प्रमुख मागण्यांसाठी आज देशव्यापी संप पुकारला असून याचा फटका हजारो विद्यार्थ्यांना बसला आहे. अंगणवाडीला टाळं असल्याने नेहमीप्रमाणे पोषण आहाराच्या आशेने आलेल्या चिमुकल्यांना बंद दाराचा सामना करावा लागला. अंगणवाडी केंद्राबाहेर हातात रिकाम्या ताटल्या घेऊन बसलेली ही मुले अन्नाच्या प्रतीक्षेत होती.
एकीकडे शासकीय दर्जा आणि हक्काच्या वेतनासाठी सेविकांच्या आक्रोश सुरू असताना, दुसरीकडे पोषण आहार न मिळाल्याने लाखो लहान मुले आज पोषक आहारापासून वंचित राहिली आहेत. प्रशासनाने यावर त्वरित तोडगा काढावा, अशी मागणी आता सर्व स्तरातून जोर धरत आहे.अंगणवाडी सेविकांच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे : –
केंद्र सरकारच्या चार श्रम संहिता रद्द करण्यासाठी अंगणवाडी सेविकांची मागणी
शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा आणि हक्काच्या वेतनश्रेणीसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा एल्गार
गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सेविकांना २४ हजार ८०० रुपये आणि मदतनीसांना २० हजार ४०० रुपये वेतन देण्याची मागणी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कामाचा थकीत मोबदला तातडीने देण्याची मागणी
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मूळ कामाव्यतिरिक्त इतर कामांना जुंपू नका समन्वय समितीचा इशारा
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ग्रॅच्युटी लागू करा आणि सामाजिक सुरक्षा म्हणून पेन्शन द्या
उन्हाळी सुट्टी १५ दिवसांऐवजी १ महिना करा आणि आजारपणाची भरपगारी रजा मंजूर करा
FRS मधील तांत्रिक अडचणी दूर करा आणि 5 जी मोबाईलसह ३ हजार ६०० रुपये रिचार्ज भत्ता द्या


