महावितरणच्या वाढीव लाईट बिलांविरोधात संतप्त नागरिकांचा इशारा
भिस्तबाग कार्यालयाला ठोकले टाळे; ८ दिवसांत तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
जुना मीटर द्या, वाढीव बिल रद्द करा; अन्यथा बिल भरणार नाही! – संपत बारस्कर
अहिल्यानगर : शहरामध्ये महावितरण विभागाकडून स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरू असून नागरिकांना सरासरी २ ते ३ हजार रुपये वाढीव लाईट बिल येत आहे. याआधी जुन्या मीटरवरती सरासरी केवळ ५०० ते १ हजार रुपये इतकं लाईट बिल येत होतं. मात्र स्मार्ट मीटर लावल्यानंतर बिलात प्रचंड वाढ झाल्याने संतप्त नागरिकांनी भिस्तबाग महावितरण कार्यालयाला जाब विचारत जोरदार निदर्शने केली. आक्रमक झालेल्या नागरिकांनी कार्यालयाच्या मुख्य दरवाजाला टाळे ठोकत, जोपर्यंत आमचे जुने मीटर पुन्हा बसवले जात नाहीत आणि वाढीव लाईट बिल रद्द किंवा कमी करून दिलं जात नाही, तोपर्यंत हे कार्यालय बंद राहणार. महावितरणने तातडीने तोडगा काढावा, अन्यथा सर्व ग्राहकांनी बिल भरणं थांबवावं, असा स्पष्ट इशारा दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी यावेळी सांगितले की, सर्वसामान्य नागरिक महागाईच्या काळात घरखर्च चालवत आहेत. अशा परिस्थितीत एका सामान्य कुटुंबाला महिन्याला २ ते ३ हजार रुपयांचं लाईट बिल भरणं शक्य नाही. वाढीव बिल हा लोकांवर अन्याय आहे. जर ८ दिवसांच्या आत हा प्रश्न मार्गी लागला नाही, तर महावितरण कार्यालयावर तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल.
या आंदोलनात माजी नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, संभाजी पवार, परिसरातील महिला नागरिक, ज्येष्ठ नागरिक, तसेच नवीन वसाहतींतील रहिवासी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संतप्त नागरिकांनी एकमुखाने ‘महावितरण मुर्दाबाद’, आमच्या खिशाला आग लावणारे बिल आम्हाला नको, अशा घोषणा देत निषेध नोंदवला.
डॉ. सागर बोरुडे यांनी म्हटलं की, प्रभाग क्रमांक एकमधील तपोवन रोड, भिस्तबाग महाल, पवन नगर, गोकुळ नगर, डॉन बॉस्को, लक्ष्मी टॉवर्स आदी भागातील नागरिकांना सरळपणे तीन पट बिल पाठवण्यात आलं आहे. लोकांचा आर्थिक बोजा वाढला असून, घर चालवणं अवघड झालंय. कोणतीही पूर्वसूचना न देता ठेकेदार हे स्मार्ट मीटर लावून जुने मीटर उचलून नेत आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून हा सावळा गोंधळ सुरू आहे. नागरिकांनी अनेक वेळा कार्यालयात तक्रारी केल्या पण कुठलीच कारवाई झालेली दिसत नाही. म्हणूनच नागरिकांनी आता संताप व्यक्त करत कार्यालयाला टाळे ठोकण्याचा निर्णय घेतला आहे.
यावेळी संतप्त नागरिकांनी सांगितलं की, जुने मीटर अधिक विश्वासार्ह होते. त्यावर आलेली बिलं वाजवी होती. स्मार्ट मीटर बसवल्यानंतर यंत्रणेतील पारदर्शकता हरवली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. आमच्या हातात काहीच राहिलं नाही. आम्ही बिल भरतो पण अजून वाढतंच आहे. काहीच उपयोग नाही. महिन्याचा किराणा भरायचा की लाईट बिल भरायचं, असा प्रश्न समोर उभा राहिलाय.
संपत बारस्कर यांनी चेतावणी दिली की, जर ८ दिवसांत समाधानकारक तोडगा निघाला नाही, तर आम्ही महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार. गरज पडल्यास वीज वितरण कार्यालय बंद पाडू. सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढा दिला जाईल.


