राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते व येवल्याचे आमदार छगन भुजबळ यांची अखेर मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. राज्यात महायुतीचं सरकार अस्तित्वात आल्यापासून भुजबळांना मंत्रीपद वाटपात डावलण्यात आल्याची जोरदार चर्चा रंगली होती. यासंदर्भात खुद्द छगन भुजबळांनी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या नाराजी बोलून दाखवली होती. अखेर त्यांच्या मंत्रीपदावर शिक्कामोर्तब झालं असून धनंजय मुंडे यांचं अन्न व नागरी पुरवठा खातं भुजबळांना दिलं जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, यासंदर्भात अंजली दमानियांनी केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.
काय म्हणाल्या अंजली दमानिया?
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाच छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळातील समावेशावरून सवाल केला आहे.
“वाह फडणवीस वाह, म्हणजे एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री येणार? जनता अशीच भरडली जमणा? की हा माझ्यासारख्या भ्रष्टाचार विरोधी लढणाऱ्यांना संदेश आहे, की तुम्ही आमचं काहीच वाकडं करू शकत नाही? असा काय नाईलाज आहे? की सभ्य माणसं मिळत नाहीत राजकारणात?” असा सवाल अंजली दमानियांनी केला आहे.
“..तेव्हा छातीत कळ यायची, आता ठणठणीत का?”
“आणि हो, हेच भुजबळ जेव्हा जेलमध्ये होते, तेव्हा एक अगदी बिचाऱ्यासारखा फोटो माध्यमांमध्ये दाखवला जायचा. तेव्हा छातीत कळ यायची. मग आता ठणठणीत? किळस वाटतेय महाराष्ट्राच्या राजकारणाची”, अशी टीकाही अंजली दमानियांनी केली आहे.
“या घोषणा आठवतात?”
“भ्रष्टाचारीयों पर कारवाई के लिए, अब की बार ४०० पार’, ‘भ्रष्टाचार के खिलाफ मोदी सरकार के बडे कदम’, हा आहे का तो बडा कदम? ही ती कारवाई?” असे सवालही त्यांनी उपस्थित केले आहेत.


