राज्यातील भ्रष्टाचार, गैरव्यवहार याविरोधात आवाज उठवून राजकारणात खळबळ उडविणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचे पती अनिश दमानिया यांची महाराष्ट्र सरकारच्या ‘इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन’ (मित्रा) या संस्थेच्या मानद सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या संस्थेचा उपयोग शाश्वत विकासासाठी धोरण आखणे व मार्गदर्शन करण्यासाठी केला जातो.
अंजली दमानिया यांच्या पतीला राज्य सरकारच्या संस्थेत मानद पदावर नियुक्त करण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळातून चर्चेला सुरुवात झाली आहे. एकीकडे अंजली दमानिया विविध राजकीय नेते, मंत्री आणि माजी मंत्र्यांविरुद्ध भ्रष्टाचाराचे प्रकरणे उघड करत असताना, त्याचवेळी त्यांच्या पतीची मुख्यमंत्र्यांच्या अधिपत्याखालील संस्थेत नियुक्ती झाल्यामुळे त्यांच्या टीकेची झोड उठत आहे.
रोहित पवार यांची उपरोधिक टीका
या घडामोडीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस रोहित पवार यांनी समाजमाध्यमांवर उपरोधिक टिप्पणी केली. “महाराष्ट्र सरकारची थिंक टँक असलेल्या ‘मित्रा’ या संस्थेवर मानद सल्लागारपदी अनिश दमानिया यांची नेमणूक झाल्याबद्दल अभिनंदन. एकीकडे भ्रष्टाचाराची प्रकरणे काढून अंजली दमानिया सामाजिक क्षेत्रात योगदान देत आहेत. आता अनिश दमानिया यांचे आर्थिक विकासाच्या क्षेत्रात सरकारला मार्गदर्शन लाभणार आहे. दमानिया कुटुंबाचे आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रातील समन्वय निश्चितच महत्त्वपूर्ण राहील. पुनश्च एकदा अभिनंदन आणि शुभेच्छा,” असे त्यांनी म्हटले आहे.
या टीकेला उत्तर देताना अंजली दमानिया यांनीही सोशल मीडियावर परखड प्रतिक्रिया दिली. “रोहित पवार यांचा समाज माध्यमावरील संदेश वाचल्यावर मला तितकस वाईट वाटले नाही. हे तर अपेक्षित होते. अनिश, हा त्याच्या ऑफिस मधील तिसरा असा व्यक्ती आहे, जो ‘एफआयसीसीआय’चा सभासद झाला. म्हणून त्याला ‘मित्रा’वर मानद सल्लागार म्हणून घेतले आहे. या पदावर काम केल्याबद्दल तो मानधन घेणार नाही. त्याला ना राजकारणाशी घेणे देणे आहे, ना सरकारशी. माझ्यासारखेच त्यालाही देशाला पुढे नेण्यासाठी आपले योगदान द्यायचे आहे. हे वृत्त त्याने आणि मी आपआपल्या समाज माध्यमांवर प्रसारित केले आहे. त्यात लपवण्यासारखे काहीच नाही, मला तर त्याचा खूप अभिमान आहे,” असे म्हणत त्यांनी टीकाकारांना उत्तर दिले आहे.


