अभिषेक कळमकरविरुद्ध आणखी एक अत्याचाराचा गुन्हा
अहिल्यानगरचे माजी महापौर तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर याच्याविरुद्ध महिलेवर अत्याचार केल्याचा आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. फकीरवाडा परिसरातील एका तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या तरुणीने म्हटले आहे की, लोकसभा निवडणुकीच्या प्रचार काळात आपली कळमकर यांच्या सोबत ओळख झाली. त्यानंतर त्याने आपल्यला नोकरीचे आमिष दाखविले त्यासाठी भिंगार कॅम्प परिसरातील नगर क्लब जवळ बोलाविले. तेथे पाण्यातून गुंगीचे औषध देऊन अत्याचार केला. त्याचे व्हिडीओ तयार केले. हा प्रकार कोणाला सांगू नको, अन्यथा व्हिडीओ व्हायरल करील अशी धमकी दिली. मी जेव्हा बोलाविल, जेव्हा बोलाविल तेव्हा यायचे, असेही आरोपीने धमकावल्याचे फिर्यादित म्हटले आहे.
कळमकर याच्याविरुद्ध या पूर्वीही एका महिलेवर अत्याचार केल्याचा गुन्हा तोफखाना पोलिस ठाण्यात दाखल आहे. तिलाही शाळेत नोकरी देण्याचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचा आरोप आहे.
या गुन्ह्यात कळमकर याचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला आहे. सध्या तो फरार आहे. न्यायालयाने त्याच्याविरुद्ध स्टँडिंग अटक वॉरंट काढले आहे. मात्र पोलिसांना तो अद्याप सापडला नाही. त्यामुळे पोलिसांना तो सापडत नाही की त्यांच्यावर कोणाचा दबाब आहे, अशी शंका व्यक्त होऊ लागली आहे.
कळमकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नगर शहरातून विधानसभा निवडणूक लढविली होती. आमदार संग्राम जगताप यांनी त्यांचा पराभव केला होता. कळमकर यांच्याकडे पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष पद आहे. त्यांच्याविरुद्ध आता अत्याचाराचे दोन गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात ते फरारी आहेत. त्यामुळे पक्ष काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.. पूर्वी गुन्हा दाखल झाला, तेव्हा राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप त्यांच्याकडून झाला होता.. आता हा दुसरा गुन्हा दाखल झाला आहे.
अहिल्यानगरचे माजी महापौर अभिषेक कळमकरविरुद्ध आणखी एक अत्याचाराचा गुन्हा
- Advertisement -


