पाथर्डी तालुक्यातील करंजी घाटामध्ये आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास नगरकडून शेवगावकडे सहा नवे ट्रॅक्टर घेऊन जात असलेल्या कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने करंजी घाटातील माणिकशहा पीरबाबा जवळील धोकादायक वळणावर हा कंटेनर ५० फूट खोल दरीत जाऊन कोसळला. या अपघातामध्ये कंटेनरसह सहा नव्या ट्रॅक्टरचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात कंटेनर चालक जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी राज्य मार्ग पोलीस विभागाच्या पथकाने उपचारासाठी नगरला पाठवले आहे.
घटनास्थळी मोठी गर्दी
घाटातील धोकादायक वळणाजवळ घडलेल्या अपघातामुळे करंजी घाटात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. परंतु राज्य मार्ग पोलीस विभागाने काही वेळातच वाहतूक सुरळीत केली. करंजी घाटात नवे ट्रॅक्टर दरीत पडल्याची माहिती समजताच प्रवाशांसह परिसरातील नागरिकांनी अपघात पाहण्यासाठी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.


