Thursday, October 30, 2025

अहिल्यानगर महानगरपालिकेत कोर्टाच्या आदेशानुसार २० कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान

अहिल्यानगर महानगरपालिकेत लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार आणि कोर्टाच्या आदेशानुसार २० कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान

मनपा संस्था हीच कर्मचाऱ्यांची ओळख – आ. संग्राम जगताप

अहिल्यानगर : महानगरपालिकेमध्ये लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार आणि हायकोर्टाच्या आदेशानुसार सफाई कामगार वारस हक्काची अंमलबजावणी व्हावी यासाठी युनियन च्या माध्यमातून पाठपुरावा केला असल्यामुळे त्याला यश आले आहे. महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असून कर्मचाऱ्यांनी देखील चांगले काम करून संस्थेचा नावलौकिक वाढावा. महापालिका प्रशासनाने देखील उत्पादनाची साधने शोधून आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी पावले उचलावीत. महापालिका संस्था ही कर्मचाऱ्यांची असून सर्वांनी प्रामाणिकपणे काम करावे संस्था हीच कर्मचाऱ्यांची ओळख आहे. मनपा कर्मचारी युनियनने देखील महापालिका कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन कामकाज करण्याचे आदेश द्यावे, संस्था वाढीसाठी पुढाकार घ्यावा. पूर्वी मी महापौर असताना शहरात २ टाईम साफसफाई करण्यात येत होती मात्र आता बोजबारा उडाला आहे. अधिकारी येथील आणि जातील मात्र कर्मचाऱ्यांनी महापालिकेशी प्रामाणिकपणा जोपासला पाहिजे. कर्मचाऱ्यांना वारस हक्काच्या नोकऱ्या मिळाव्यात यासाठी शासन दरबारी पाठपुरावा केला असल्यामुळेच ते शक्य झाले असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
अहिल्यानगर महानगरपालिकेत लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार आणि कोर्टाच्या आदेशानुसार २० कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करताना आमदार संग्राम जगताप, आयुक्त यशवंत डांगे, जल अभियंता परिमल निकम, आस्थापना विभाग प्रमुख मेहर लाहारे, युनियनचे अध्यक्ष बाबासाहेब मुदगल, जितेंद्र सारसर, सचिव अनंद वायकर, नंदकुमार नेमाने, राहुल साबळे, बलराज गायकवाड़, ऋषिकेश भालेराव, भरत सारवान, बाबासाहेब राशिनकर, बाळासाहेब व्यापारी, महादेव कोतकर, दिपक मोहिते आदी उपस्थित होते
आयुक्त यशवंत डांगे म्हणाले की महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असून जीएसटी पोटी राज्य सरकारकडून १२ कोटी रुपये मिळत असून सातवा वेतन आयोग लागू झाला असल्यामुळे महापालिकेला १ कोटी ७५ लाख रुपये भरावे लागतात. वर्षाकाठी २० कोटी रुपये अतिरिक्त खर्च येत आहे. कर्मचाऱ्यांनी देखील संस्थेच्या हितासाठी काम करावे असे ते म्हणाले.
अध्यक्ष बाबासाहेब मुदगल म्हणाले की हाय कोर्टाच्या आदेशानुसार कामगारांना नोकरीमध्ये सामावून घेण्यासाठी युनियनच्या माध्यमातून आमदार संग्राम जगताप यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांनी देखील मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून विषय मार्गी लावून घेतला. आपल्या महापालिकेमुळे संपूर्ण राज्यातील मनपाला हा निर्णय घ्यावा लागला आहे. आमदार संग्राम जगताप हे सर्वसामान्य जनतेला डोळ्यासमोर ठेवून प्रश्न मार्गी लावीत असतात त्यामुळे त्यांना महापालिकेत दयावान म्हटले जाते. कर्मचाऱ्यांनी देखील आपली संस्था आपली नोकरी याकडे लक्ष द्या कारण नसताना राजकारण आणू नका. आपण सर्वजण मिळून महापालिकेच्या कामकाजामध्ये सुधारणा करून प्रशासनाला हातभार लावून चांगल्या कामाच्या माध्यमातून मदत करू असे ते म्हणाले

लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसाच्या नोकऱ्या प्रलंबित होत्या अनेक दिवस हायकोर्टामध्ये केस सुरू होते. युनियनच्या पाठपुराव्याला यश आले आणि आमदार संग्राम जगताप यांनी देखील राज्य सरकारकडे पाठपुरावा केला असल्यामुळे कामगारांना सेवेत घेण्यासाठी शासनाने मंजुरी दिली त्यामुळे आज २० कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्राचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती कामगार युनियनचे सचिव आनंद वायकर यांनी सांगितले

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles