लाड पागे समितीच्या शिफारशींची प्रभावीपणे अंमलबजावणी करा – अनुसूचित जाती जमाती आयोग सदस्य ॲड. गोरक्ष लोखंडे
अहिल्यानगर, – सफाई कामगारांच्या हक्कासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या लाड पागे समितीच्या शिफारशींची अत्यंत प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. याअंतर्गत प्रलंबित असलेली प्रकरणे तातडीने निकाली काढून कामगारांच्या वारसांना शासकीय सेवेत सामावून घेण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य ॲड.गोरक्ष लोखंडे यांनी दिले.
महानगरपालिकेच्या सभागृहात आयोजित बैठकीत ॲड. लोखंडे बोलत होते. बैठकीस महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे, उपायुक्त डॉ.संतोष टेंगळे,मुख्य लेखा व वित्त अधिकारी सचिन धस, सहायक आयुक्त सपना वसवा, अशोक साबळे, निखिल फराटे, मेहेर लहारे, जल अभियंता परिमल निकम, शहर अभियंता मनोज पारखे, पाणी पुरवठा विभागाचे उप अभियंता गणेश गाडलकर, अतिक्रमण विभाग प्रमुख आदित्य बल्लाळ, संगणक विभाग प्रमुख अंबादास साळी, कामगार अधिकारी धनंजय शित्रे, प्रभाग अधिकारी राकेश कोतकर, श्याम गोरलकर, शहाजहान तडवी आदी उपस्थित होते.
श्री.लोखंडे म्हणाले, कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना नियमानुसार वेतन व सवलती द्याव्यात, कामगारांना किमान वेतन मिळेल याची दक्षता घ्यावी. सफाई कर्मचाऱ्यांना हातमोजे, मास्क आदी सुरक्षा साधने तात्काळ पुरविण्यात यावेत. कर्मचाऱ्यांची नियमित आरोग्य तपासणी करण्यात यावी. रमाई आवास योजनेंतर्गत लाभार्थ्यांना वेळेत लाभ देण्यात यावा. शहरातील झोपडपट्टी भागात आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा पुरविण्याच्या सूचनाही ॲड.लोखंडे यांनी यावेळी दिल्या.
दोन वारसांना नियुक्तीपत्राचे प्रदान
लाड पागे समितीच्या शिफारशीअंतर्गत दोन कर्मचाऱ्यांच्या वारसांना ॲड. गोरक्ष लोखंडे यांच्या हस्ते नियुक्तीपत्राचे प्रदान करण्यात आले. विनोद नेटके व सौरभ भोसले या वारसांना नियुक्तीपत्र प्रदान करत चांगले काम करा,असेही ॲड. लोखंडे म्हणाले.
रमाई आवास योजना प्रकल्प व विविध विकास कामांची पाहणी
रमाई आवास योजनेंतर्गत शहरातील प्रकल्पांना ॲड.गोरक्ष लोखंडे यांनी भेट देऊन पहाणी केली. तसेच यावेळी लाभार्थ्यांशी संवादही साधला. या प्रकल्पांना आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या. तसेच रामवाडी, सिद्धार्थनगर भागाला प्रत्यक्ष भेट देऊन त्याठिकाणच्या विविध विकास कामांची पहाणीही त्यांनी यावेळी केली.
लाड पागे समितीच्या शिफारशीअंतर्गत सफाई कामगारांच्या दोन कर्मचाऱ्यांच्या वारसांना नियुक्तीपत्र प्रदान
- Advertisement -


