उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील काही वेळातच मुंबईला रवाना होणार आहेत. गणपतीसाठी ते सातारा जिल्ह्यातील त्यांच्या मुळ दरेगावी आले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईमध्ये असलेल्या बैठकीसाठी रवाना होणार असल्याची माहिती मिळत आहे..
दरम्यान, यावेळी फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी तुम्ही आंदोलकांना मदत करता? असा सवाल प्रसारमाध्यमांनी विचारल्यावर एकनाथ शिंदे भडकल्याचे पाहायला मिळाले.
मी सगळं खुलेआम करतो. लपून छपून, बंद दाराआड काही करत नाही
मी सगळं खुलेआम करतो. लपून छपून, बंद दाराआड काही करत नाही. जे पाप पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी केले होत 2019, जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला होता अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. ते दुरुस्त करण्याचे काम आम्ही केल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. 2022 मध्ये महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातलं सरकार आणलं. देवेंद्रजी आणि आम्ही सर्वजण ताकदीने सर्व प्रसंगांना तोडं देऊ. सरकार म्हणून आम्ही योग्य तो निर्णय घेऊ असे एकनाथ शिंदे म्हणाले. विरोधक संभ्रम निर्माण करत आहेत. समाजासमाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्य सरकार योग्य निर्णय घेण्यास समर्थ असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.
आत एक बाहेर एक भूमिका नको, आम्ही स्पष्ट भूमिका घेतो असे एकनाथ शिंदे म्हणाले. कायदेशीर बाबी तपासून योग्य तो निर्णय घेऊ. चर्चेतून चांगला मार्ग काडू असे एकनाथ शिंदे म्हणाले. सर्वांनी सहकार्याचीभूमिका घ्यावी. मनोज जरांगे पाटील यांनी देखील समाजासाठी लढा उभारला आहे. त्यांनी देखील सहकार्य करावं असे एकनाथ शिंदे म्हणाले. आत्तापर्यंत कुणबी नोंदी मिळत नव्हत्या. पण सध्या कुणबी नोंदी आणि प्रमाणपत्र मिळू लागली असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. 10 टक्के आरक्षण आम्ही दिले आहेत. इतर समाजाला जे फायदे मिळतात ते देखील देणं सुरु असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. मी मुख्यमंत्री असताना आणि आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सरकार सकारात्मक होते असे एकनाथ शिंदे म्हणाले.
दरम्यान, एकनाथ शिंदे हे तातडीने मुंबईला रवाना होणार आहेत. दरे गावातील सर्व कार्यक्रम त्यांनी रद्द केले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील पुण्यातील सगळे कार्यक्रम रद्द केले आणि ते तातडीने मुंबईला रवाना झाले आहेत.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले आहेत. मनोज जरांगे पाटील यांचे तीन दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानात आमरण उपोषण सुरु आहे. आरक्षण मिळाल्याशिवाय उठणार नाही, अशी ठाम भूमिका जरांगे यांनी घेतल्यामुळे सरकारवर दबाव वाढत चालला आहे. त्यातच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरे गावात निघून गेल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. आता एकनाथ शिंदे हे दरे गावात असतानाच शिवसेनेच्या आमदाराने मनोज जरांगे पाटलांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
खासदार संदिपान भुमरे यांचे पुत्र विलास भुमरे आमदार विलास भुमरे हे आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी दाखल झाले. विलास भुमरे हे पैठणचे शिवसेनेचे आमदार आहे. यावेळी विलास भुमरे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत काय काळ चर्चा देखील केली. तर विलास भुमरे यांच्या सोबत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार राजू नवघरे हे देखील उपस्थित असल्याचे दिसून आले.