भाजपपाकडे तब्बल ३१० इच्छुकांची उमेदवारीची मागणी; महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपाची प्रत्येक प्रभागात १०० टक्के तयारी
अहिल्यानगर-नुकत्याच झालेल्या नगरपालिका व नगर पंचायत निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाने वेगळी रणनीतीचा वापर करून पूर्ण ताकदीने त्या निवडणुका लढल्या आहेत. आता अहिल्यानगर महानगरपालिकेसाठीही पक्षाची वेगळी रणनीती असणार आहे. पक्ष प्रत्येक प्रभागाचा सुक्ष्म सर्वे करत आहे. या सर्वेनंतरच उमेदवार निश्चितीचा निर्णय प्रदेश पातळीवरून घेतला जाईल. निवडणुकीसाठी महायुतीचा निर्णयही प्रदेश पातळीवरूनच होणार आहे. तरीही ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढण्याची पक्षाची तयारी आहे. निवडणुकीसाठी पक्षाची प्रत्येक प्रभागात १०० टक्के तयारी झाली आहे. जर महायुती झाली नाहीतर स्वबळावर लढण्याची आमची तयारी आहे, असे प्रतिपादन भाजपाचे महानगरपालिका निवडणुकीचे सह प्रभारी आ.विक्रमसिंह पाचपुते यांनी केले.
अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना सोमवारी सकाळी तारकपूर येथील एका हॉटेलच्या सभागृहात सुरवात झाली. यावेळी आ. विक्रमसिंह पाचपुते, शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, उत्तर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, माजी शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर व समन्वयक विनायक देशमुख यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. तत्पूर्वी उपस्थित पदाधिकाऱ्यांना व इच्छुक उमेदवारांना आ.पाचपुते यांनी मार्गदर्शन केले.
आ. पाचपुते पुढे म्हणाले, भारतीय जनता पार्टीच्या सर्वेमध्ये बारीकसारीक गोष्टींचा विचार केला जाणार आहे. सर्वेत ज्याचे नाव आघाडीवर असेल अशा उमेदवारांचा विचार केला जाणार आहे. ज्याच्याकडे अपुरी यंत्रणा आहे पण निवडून देण्याची क्षमता आहे अशा सामान्य कार्यकर्त्यालाही पक्ष तिकीट देणार आहे. इच्छुक उमेदवारांनी आपल्या प्रभागात केलेल्या कामांचा लोखाजोखा द्यावा तसेच जास्तीत जास्त संपर्क ठेवून प्रभागातील प्रभुत्वावर भर द्यावा, असे आवाहन केले.यावेळी शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते म्हणाले, महानगरपालिकेच्या निवडणुकीची पक्षाने जय्यत तयारी सुरू केली आहे. शहरातील महानगरपालिकेच्या १७ प्रभागांसाठी तब्बल ३१० इच्छुक उमेदवारांनी पक्षाकडे अर्ज दाखल केले आहेत. भाजपावर वाढत चालेल्या विश्वासामुळेच मुलाखतींना एवढा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. निवडणुकीत कोणालाही वशिल्याने उमेदवारी मिळणार नाही. महापालिकेवर भाजपचा झेंडा किंवा महायुतीचा झेंडा फडकेल या दृष्टीने कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी पूर्ण ताकदीने निवडून लढवावी.
यावेळी सरचिटणीस महेश नामदे यांनी प्रास्ताविक केले. सरचिटणीस अशोक गायकवाड यांनी आभार मानले. यावेळी मोठ्या संख्येने इच्छुक उमेदवार व पदाधिकारी उपस्थित होते.


