पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात भारत देश आक्रमक झाला आहे. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारत पाऊले उचलत आहे. पाकिस्तानविरोधात भारताने अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. पाकिस्तानने केलेल्या या हल्ल्याबाबत आता एआयएमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी प्रतिक्रिया देत पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढवला आहे.’आमचा देशाच्या लष्कराचं जेवढं बजेट आहे तेवढं तुमच्या देशाचं आहे.’, असा टोला ओवैसी यांनी पाकिस्तानला लगावला. तसंच, ‘पाकिस्तान अर्धा तास नाही तर ५० वर्षे मागे आहे.’, असं म्हणत त्यांनी पाकिस्तानला धारेवर धरलं. असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानची तुलना दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट अर्थात ISIS सोबत केली. पाकिस्तानने अणुबॉम्ब हल्ल्याबाबत दिलेल्या धमकीवर देखील ओवेसी यांनी प्रतिक्रिया दिली. पाकिस्तान वारंवार म्हणतो की आमच्याकडे अणुबॉम्ब आहे. पण त्यांनी हे लक्षात ठेवावे की जर तुम्ही कोणत्याही देशात जाऊन निष्पाप लोकांना मारत असाल तर कोणताही देश शांत बसणार नाही.’
असदुद्दीन ओवैसी यांनी पुढे सांगितले की, ‘सत्तेत कोण आहे हे महत्त्वाचे नाही. अशाप्रकारे येऊन आपल्या भारतीय भूमीवर हल्ला करणे आणि एखाद्याचा धर्म विचारून गोळ्या घालणे चुकीचे आहे. तुम्ही कोणत्या धर्माबद्दल बोलत आहात तुम्ही ख्वालिदपेक्षाही वाईट आहात. तुम्ही आयएसआयएसच्या दहशतवाद्यांसारखे वागलात. निष्पाप लोकांना त्यांचा धर्म विचारून मारणे हा आपला धर्म नाही.’
ओवैसी यांनी पाकिस्तानला खडेबोल सुनावत सांगितले की, ‘तुम्ही अर्धा तास मागे नाही तर अर्धशतक मागे आहात. तुमच्या देशाचं बजेट हे फक्त आमच्या लष्कराच्या बजेट एवढं आहे. तुम्ही आमची बरोबरी करू शकत नाही. कोणत्याही देशात जाऊन तुम्ही निष्पाप लोकांना माराल तर कोणीही शांत बसणार नाही. जेव्हा दहशतवाद्यांना शिक्षा होईल तेव्हाच पीडित कुटुंबांना न्याय मिळेल.’
‘पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना त्यांच्या कल्पनेपलीकडे शिक्षा देऊ.’, असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. पीएम मोदींच्या या विधानाचे ओवेसी यांनी गुरुवारी स्वागत केले. दरम्यान, जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यापासून ते दहशतवाद आणि पाकिस्तानविरुद्ध उघडपणे बोलत आहेत. २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी २८ पर्यटकांची गोळ्या घालून हत्या केली होती.


