मुंबई : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातवर कारवाईची तयारी आधीपासून सुरू होती. पोलिसांनी पूर्व नियोजन ही कारवाई केली असून या गंभीर प्रकरणात कोणाचा दुरान्वये संबंध जरी आला तरी त्याला सोडणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिला. याप्रकणी मंगळवारी विधिमंडळात सविस्तर निवेदनाच्या माध्यमातून सरकारची भूमिका स्पष्ट केली जाईल, असेही फडणवीस यांनी जाहीर केले.
भोंदूबाबाअशोक खरातने महिलांचे शोषण केल्याबाबत विजय वडेट्टीवार, नाना पटोल, भास्कर जाधव आदी सदस्यांनी स्थगत प्रस्तावाच्या माध्यमातून या गंभीर विषयावर सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. तथाकथिक भोंदूबाबा अशोक खरातचे प्रकरण अतिशय गंभीर असून यासंदर्भात सगळी माहिती काढण्याचे काम सुरू आहे. या अशोक खरातने त्याच्या तथाकथित शक्तीचा उपयोग-दुरुपयोग करून आणि दिशाभूल करून अनेक महिलांबरोबर गैरव्यवहार, दुष्कृत्य केल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणाची कारवाई पोलिसांनी पूर्व नियोजन करून केली आहे.
या घटनेत महिलांचा समावेश असल्यामुळे म्हणजेच महिलांची फसवणूक झाल्याने त्या तक्रार करण्यासाठी पुढे यायला तयार नव्हत्या. पण पोलिसांनी धीर दिल्यानंतर त्यातील काही महिलांनी तक्रार दाखल केली. आणखी काही महिला तक्रार देतील. या प्रकरणाचा सखोल तपास सुरु असून मंगळवारी सभागृहात सविस्तर निवेदन केले जाईल अशी माहिती फडणवीस यांनी दिली.या प्रकरणात अशोक खरातवर कारवाई जरी आता झाली असली तरी त्याची तयारी आधीपासून सुरू होती. खरातच्या अटकेच्या आधी म्हणजे १० मार्च रोजी दुसऱ्या जिल्ह्यातून एका तक्रारीचा उपयोग करून खरात देशाबाहेर पळून जावू नये यासाठी लूट आऊट नोटीस जारी करण्यात आली होती असेही फडणवीस यांनी सांगितले. हा राजकारणाचा मुद्दा नाही. कारण हा महिलांच्या प्रतिष्ठेचा हा प्रश्न आहे. त्यामुळे या प्रकरणी कोणाचा दुरान्वये सबंध आला तरी त्याला सोडणार नाही असा इशारा देतानाच विरोधकांनीही याचे राजकारण करु नये असे आवाहन फडणवीस यांनी केले.
भोंदूबाबा अशोक खरातशी सबंधित राजकारणीही अडकणार…!
- Advertisement -


