अहिल्यानगर तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीला त्रास देण्याच्या प्रयत्नासोबतच तिच्या कुटुंबियांना मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या (वय 17) फिर्यादीवरून अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.रोहित मच्छिंद्र मोहिते, मयुर मच्छिंद्र मोहिते, मच्छिंद्र दशरथ मोहिते (सर्व रा. बाबुर्डी बेंद, ता. अहिल्यानगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. फिर्यादी मुलगी आपल्या घरी असताना संशयित आरोपी रोहित मोहिते हा तिच्या घरात शिरला. त्याने फिर्यादीला तुझ्याशी बोलायचे आहे, माझ्याबरोबर चल असे सांगून हात धरून छेडछाड केली. यावेळी रोहितने तिच्यासोबत लज्जास्पद वर्तन केले. त्यानंतर रोहित व मयुर मोहिते यांनी फिर्यादीचे तोंड दाबले.
दरम्यान मयुर व मच्छिंद्र मोहिते यांनी फिर्यादीचे आजोबा व वडिलांना शिवीगाळ करत लोखंडी गजाने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. इतकेच नव्हे तर जिवे ठार मारू अशी धमकीही दिली. या प्रकाराबाबत पीडित मुलगी व कुटुंबीयांनी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात धाव घेतली. पीडितेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी विनयभंग, पोस्को आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.


