अहिल्यानगर-शहरातील पिंजारगल्ली परिसरात राजकीय हेतूने प्रेरित होऊन सुवेंद्र गांधी यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. या घटनेत फिर्यादी रोनक सतीश मुथ्था यांच्या कारचे मोठे नुकसान झाले असून, चौघांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोनक मुथ्था हे १३ जानेवारीच्या रात्री दुकानाचे काम संपवून घरी जात असताना ही घटना घडली. पिंजारगल्ली येथे मुथ्था यांचे मित्र सुवेंद्र गांधी, रोशन गांधी आणि ओंकार जोशी यांच्याशी चर्चा करत असताना आरोपी तिथे पोहोचले. आरोपी करण ऊर्फ बंटी सुनील ढापसे, पप्पू ढापसे, जितेंद्र सुनील ढापसे आणि भूषण अर्जुन ढापसे यांनी जुन्या वादातून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी आरोपींनी हातातील दगड सुवेंद्र गांधी आणि रोनक मुथ्था यांच्या दिशेने भिरकावले. प्रसंगावधान राखल्यामुळे कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही, मात्र मुथ्था यांच्या टाटा नेक्सॉन कारची मागील काच फुटून नुकसान झाले. आरोपींनी यावेळी फिर्यादी व त्यांच्या मित्रांना धक्काबुक्की करत जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून महिला पोलीस अंमलदार वैशाली पटारे पुढील तपास करत आहेत.
घोसपुरीतील तरुणाला अरणगाव शिवारात मारहाण; ४० जणांच्या टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल
मित्राच्या पत्नीला सोशल मीडियावर मेसेज पाठवल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणाला ३० ते ४० जणांच्या टोळक्याने मारहाण केल्याची घटना अरणगाव शिवारात घडली. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात वसीम शेख याच्यासह ३० ते ४० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी किरण रामदास काळे हे पुण्यातील रहिवासी असून त्यांचे मूळ गाव घोसपुरी आहे. किरण यांच्या मित्राच्या पत्नीला आरोपी वसीम शेख याने इंस्टाग्रामवर मेसेज पाठवले होते. या प्रकरणाचा जाब विचारण्यासाठी किरण हे आरोपीच्या गॅरेजवर गेले होते. यावेळी संतापलेल्या वसीम शेख याने बेकायदेशीर जमाव जमवून किरण यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात आरोपींनी केबल, लोखंडी रॉड आणि लाठ्याकाठ्यांचा वापर करून किरण यांना बेदम मारहाण केली. इतकेच नव्हे तर आरोपींनी त्यांना लाथाबुक्कीने मारहाण करत अत्यंत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. किरण यांनी तातडीने रुग्णालयात उपचार घेऊन पोलिसांत धाव घेतली. नगर तालुका पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलीस उपनिरीक्षक गांगुर्डे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. सपोनि प्रल्हाद गिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक आरोपींचा शोध घेत असून, लवकरच अटकेची कारवाई होण्याची शक्यता आहे.
सुवेंद्र गांधी यांच्यावर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न; टाटा नेक्सॉन कारची काच फोडली
- Advertisement -


