आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बहुजन समाज पक्ष स्वबळावर लढणार आहे. प्रत्येक शहरात स्वबळावर सत्तेत येण्याचा निर्धार पक्षाच्या प्रत्येक कॅडरने केला आहे, असे पक्षाचे महासचिव, पश्चिम महाराष्ट्र झोन मुख्य प्रभारी डॉ.हुलगेश चलवादी यांनी गुरुवारी (ता.७) स्पष्ट केले. छत्रपती-फुले-शाहू-आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात सर्वजनांचे हित, सर्वजनांचे सुख इच्छिणाऱ्या पुरोगामी विचारांच्या संघटना, व्यक्ती आणि हितधारकांनी हत्ती निवडणूक चिन्ह असलेल्या बसपच्या निळ्या झेंड्याखाली एकत्रित येत पक्षाचे हात बळकट करावे, असे आवाहन देखील डॉ.चलवादी यांनी केले.
महाराष्ट्रातील प्रत्येक महानगर पालिका, जिल्हा परिषद, नगर पंचायत, नगर परिषद क्षेत्रात बसपची स्वतंत्र ताकद आहे. वॉर्ड, वस्ती आणि ब्लॉक निहाय पक्षाची रचना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यान्वित करण्यात आली आहे. पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतकांच्या बळावर पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यशस्वी होईल, असा विश्वास डॉ.चलवादी यांनी व्यक्त केला.राज्यातील सत्ताधारी, विरोधकांनी ‘समाजकारणासाठी’ असलेले राजकारण रसातळाला नेले आहे. मतदारांच्या जीवावर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना सर्वसामान्यांच्या कामांचा विसर पडला आहे.
केवळ राजकारण केले जात आहे. अशात सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी बसपच्या उमेदवारांना मतदारांनी आता प्राधान्य द्यावे,असे डॉ.चलवादी म्हणाले.राजकीय स्वार्थासाठी पक्ष फोडण्याचे, लोकप्रतिनिधी पळवण्याचे काम प्रस्थापित पक्षांकडून केला जातोय. पंरतु, १००% समाजकारण करणाऱ्या बहुजनांचा पक्ष बसपने स्थानिक पातळीवर कंबर कसली आहे. प्रस्थापित पक्षांना धडा शिकवण्यासाठी पक्षाचा कॅडर तयारीला लागले आहेत, असे डॉ.चलवादी म्हणाले.


