शेअर मार्केटमध्ये जादा नफ्याचे आमिष, साडेतीन कोटीची फसवणुक; कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अहिल्यानगर -शेअर बाजारामध्ये मोठी गुंतवणूक केल्यास भरघोस परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीला तब्बल ३ कोटी ५० लाख १३ हजार रुपयांना लुबाडल्याचा धक्कादायक प्रकार अहिल्यानगरमध्ये उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी प्रणव प्रवीण कटारिया (वय २९, रा. शिवनेरी मार्ग, स्टेशन रोड) हे व्यवसायाने कंत्राटदार आहेत. त्यांची आरोपी ओकार संतोष हासे (रा. श्रीरामपूर) याच्याशी ओळख झाली होती. ओकार याने फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांना शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. एप्रिल २०२२ ते फेब्रुवारी २०२४ या कालावधीत आरोपीने फिर्यादीला गुंतवणुकीवर चांगला मोबदला देण्याचे आमिष दाखवले. या आमिषाला बळी पडून कटारिया यांनी वेळोवेळी मोठी रक्कम आरोपीच्या खात्यावर जमा केली.मात्र, दीर्घ काळ उलटूनही आरोपीने ना परतावा दिला, ना मुद्दल रक्कम परत केली.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कटारिया यांनी पोलीस प्रशासनाकडे धाव घेतली. अर्जाची चौकशी पूर्ण झाल्यानंतर शुक्रवारी याप्रकरणी अधिकृत गुन्हा नोंदवण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी तातडीने भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे हे करत आहेत. अहिल्यानगरमध्ये एवढ्या मोठ्या रकमेची फसवणूक झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles