संगमनेर शहरासह तालुक्यात विविध जाती- धर्माचे लोक एकत्र आनंदाने राहतात. मानवता हा आपला धर्म आहे, मात्र काही लोक भगवा, हिरवा, निळा असे ध्वज घेऊन जातीभेद निर्माण करू पाहत आहेत.
अशा शक्तींना रोखूण प्रत्येकासाठी तिरंगा ध्वज, देश व राज्यघटना महत्त्वाची आहे, असे सांगत, संगमनेर तालुक्यात दादागिरीसह दहशत वाढते की काय, अशी भिती निर्माण झाली आहे. पैशाच्या जोरावर काही मंडळी राजकारण करू पाहत आहे, असे घणाघाती टीकास्त्र काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोधकांचा नामोल्लेख न करता सोडलेसंगमनेर खुर्द येथील विविध कामांच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार सत्यजित तांबे, अजय फटांगरे, सरपंच श्वेता मंडलिक, उप सरपंच गणेश शिंदे, वैशाली सुपेकर, शैला देशमुख, गुलाब शेख, माजी सरपंच सावरग्या शिंदे, हरिभाऊ मंडलिक, सुभाष गुंजाळ, अरुण गुंजाळ आदी उपस्थित होते.
माजी मंत्री थोरात म्हणाले की, संगमनेर खुर्द हे छोटे भारताचे रूप आहे. येथे सर्व जाती- धर्माचे लोक येथे एकत्र नांदतात. भारतामध्ये विविधता आहे. तिरंगा ध्वजामध्ये भगवा, हिरवा, पांढरा व निळा रंग आहे. यामुळे आपली प्राथमिकता तिरंगा ध्वज, देश व राज्यघटना असली पाहिजे, असे ते म्हणाले.
आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी निळवंडे धरण व कालवे पूर्ण केले. मोठ-मोठी विकास कामे मार्गी लावली. 9 लाख लिटर दूध उत्पादन घेणारा आर्थिक समृद्ध संगमनेर तालुका बनविला. 40 वर्षे त्यांनी खूप कामे केली.
लोकशाहीमध्ये सत्ता परिवर्तन होत असते. जनतेच्या आशीर्वादाने मी विधान परिषदेमध्ये आहे. कोणतेही काम पूर्ण करण्याची ताकद माझ्यामध्ये आहे. मुख्यमंत्र्यांसह सर्वांशी माझे चांगले संबंध आहेत, हे सर्वांना माहिती आहे. संगमनेर तालुक्यातील जनतेने काळजी करू नये. माजी मंत्री थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येकाचे कोणतेही काम तत्काळ मार्गी लावू, असे आश्वासन त्यांनी दिले.
प्रास्ताविक डॉ. रविंद्र गुंजाळ, सूत्रसंचालन काशिनाथ गुंजाळ, तर सुभाष गुंजाळ यांनी आभार मानले. यावेळी गावातील नागरिकांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांची मिरवणूक काढून अनोखे स्वागत केले.
यावेळी नवनाथ आरगडे, मुजबिल बागवान, लतीफ बागवान, भाऊसाहेब बुरकुले, सोपान गोफने, पंढरीनाथ बलसाने, विलास आव्हाड, वरूण गुंजाळ, रमेश गुंजाळ, राजेंद्र देशमुख, किसन सातपुते, सुभाष आव्हाड, प्रकाश आव्हाड , सचिन टपले, अमोल टपले, लिलाबाई टपले, अकबर शेख, उत्तम टपले यांच्यासह ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते.
‘संगमनेरात सर्वसामान्यांच्या विकासासाठी मी खूप काम केले. निळवंडे धरण व कालवे पूर्ण केले. जेथे टँकर जात होते तेथे, आज पाणीच- पाणी आहे. संगमनेर दुष्काळी तालुका विकसित तालुका केला, मात्र केवळ सोशल मिडियाच्या भूलथापांमुळे लोक केलेली कामे विसरत आहेत. एकेकाळी दंगलीचे शहर असलेल्या संगमनेरला शांतता सुव्यवस्थेचे शहर बनविले आहे.
– माजी मंत्री बाळासाहेब थोरात, संगमनेर


