संगमनेर : कीर्तनकार महाराजांनी सार्वजनिक ठिकाणी राजकीय वक्तव्य करु नयेत. राज्य घटना संतांच्या विचारावरुन तयार करण्यात आली आहे, मात्र काही महाराजांनी राजकारण करण्यासाठी घुसखोरी केली आहे, असे दिसत असले तरी, या घटनेची वस्तुस्थिती खूप वेगळी आहे. केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत फायदा घडवून आणण्यासाठी अशा घटना घडवून आणल्या जात आहेत, असा खळबळजनक आरोप माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोधकांचा नामोल्लेख न करता केला आहे.संगमनेरजवळील घुलेवाडी येथे संग्राम बापू भंडारे महाराज यांनी, ‘मला नाथुराम गोडसे व्हावे लागेल,’ असे वक्तव्य केले होते. दरम्यान, या विधानावर उत्तर देताना यशोधन कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत थोरात बोलत होते.
थोरात म्हणाले की, महाराजांनी अभंगाची मांडणी चुकीची करु नये. नकारात्मक भाष्य करु नये, परंतू महाराज अभंगाचा विषय सोडून बोलायला लागले. यामुळे, याबाबत एका तरुणाने त्यांना विचारणा केल्याचा राग आल्यामुळे महाराज त्या तरुणाला, ‘सायको,’ म्हणाले, असे सांगत, थोरात म्हणाले की, महाराजांनी राजकारण करण्यासाठी घुसघोरी केली आहे. त्यांच्यावर हल्ला झाला नाही, त्यांना मारहाण झाली नाही, त्यांच्या वाहनाची कुणीही तोडफोड केली नाही. ही घटना बारकाईने पाहिल्यास, वस्तुस्थिती खूप वेगळी दिसत आहे. केवळ सोशल मिडियाच्या माध्यमातून राजकीय फायदा उठविण्यासाठी या घटनेचा वापर केला गेला आहे.
संगमनेरचे नवे लोकप्रतिनिधी कुणाच्या तरी हातचे बाहुले बनले आहेत. त्यांनी वैचारिक पातळी ठेवून, वक्तव्य केले पाहिजे. घुलेवाडी येथील संग्राम बापू भंडारे महाराजांविषयी घडलेली वस्तुस्थिती खूपच वेगळी आहे. केवळ युवकांना बदनाम करून, त्यांचा छळ करण्यासाठी पोलिसांचा आधार घेतला जात आहे. पोलिस यंत्रणा दबावाखाली काम करीत आहे.
आम्हीही हिंदू आहोत, वारकरी वारकरी धर्म मानणारे आहोत, मात्र त्याचे आम्ही प्रदर्शन करीत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्यामुळे या घटनेचा राजकीय फायदा उठविण्यासाठी अशा घटना घडवून आणल्या जात आहेत.
संगमनेर तालुक्यातील काही महाराजांनी या घटनेबाबत नाराजी व्यक्त करून, अशा घटनेत राजकारण आणू नये, अशी ठाम भूमिका मांडली आहे. सप्ताहात संतांचे विचार मांडून, समाज प्रबोधन केले पाहिजे. अन्यथा, ‘मला नथुराम गोडसे व्हावे लागेल,’ असे म्हणून, असे बलिदान होणार असेल, तर मला अभिमान वाटत आहे, असा उपहास थोरात यांनी केला.
संगमनेरला बदनाम करण्यासह विकास मोडीत काढण्याचा काहींचा प्रयत्न आजही सुरूच आहे. खोट्या केसेस दाखल केल्या जात आहेत. सध्या देशासह राज्यात परिस्थिती खूप नाजुक झाली आहे. सामाजिक वातावरण खराब होत आहे. राजकीय पातळी खालवली आहे. उद्धव- राज ठाकरे एकत्र येत असेल, तर याबाबत आम्हाला काहीच अडचण नाही, असेही थोरात यांनी स्पष्ट केले.
‘निवडणूक आयोगाचे भाषण हे कोणीतरी स्क्रिप्ट लिहून दिली आहे. अनेक महत्त्वाच्या गोष्टींना बगल देऊन जनतेचे दिशाभूल आयोग करीत आहे. ते कोणाच्यातरी आदेशानुसार काम करीत आहेत. त्यांची उत्तरे व बोलणेही अगदी राजकीय नेत्यासारखे आहे. त्यांनी एखादा राजकीय पक्ष काढणे गरजेचे आहे, असे मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.
‘सध्या राजकारण खालच्या स्तरावर गेले आहे. ही आपली संस्कृती नाही. नवीन आमदाराने आपल्या भाषणात डीएनए तपासला पाहिजे, असे वक्तव्य केले, हे अगदी खालच्या पातळीचे वक्तव्य आहे. डीएनए म्हणजे नेमकं काय, हे तरी त्यांना माहित आहे का?
माजी मंत्री बाळासाहेब थोरात, संगमनेर.


