Wednesday, September 10, 2025

सुजय विखेंसह प्रतिष्ठितांचे फोटो असलेला बॅनर फाडला; फिर्यादीच निघाला मुख्य आरोपी

शिर्डी -शहरातील लक्ष्मीनगर परिसरात गणेशोत्सवाच्या काळात माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील व त्या प्रभागात राहणार्‍या माजी नगरसेवक तसेच इतर प्रतिष्ठित व्यक्तींचे फोटो असलेले स्वागताचा बॅनर काही अज्ञात व्यक्तींनी फाडला होता. तसेच तीन दुचाकींचे नुकसान केल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली होती. त्या अनुषंगाने एकाने शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ या घटनेचा तपास लावण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेऊन चार आरोपींना तात्काळ जेरबंद केले. मात्र बॅनर फाडणारे आणि दुचाकींचे नुकसान करणारे स्वतः फिर्याद देण्यासाठी आलेले व्यक्ती असल्याचे निष्पन्न झाले आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी, की लक्ष्मीनगर परिसरात गणेशोत्सवाच्या काळात गणेश भक्तांच्या स्वागतासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, डॉ. सुजय विखे पाटील, माजी उपनगराध्यक्ष नीलेश कोते, मंगेश त्रिभुवन व प्रतीक शेळके यांचे फोटो असलेले बॅनर लावले होते. ते दोन बॅनर व त्या परिसरात उभ्या असणार्‍या तीन दुचाकींची मोडतोड करून एका दुचाकीमधील बॅटरी चोरण्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली होती. सदर घटना घडल्याची फिर्याद विशाल राजेश अहिरे याने शिर्डी पोलिसांत दिल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.

पोलिसांच्या तपासात या गुन्ह्यातील चार आरोपींपैकी फिर्याद देणारा विशाल अहिरे यानेच त्याच्या साथीदारासह हे कृत्य केल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे फिर्यादीच आरोपी निघाल्याची जोरदार चर्चा शहरात सुरू झाली. या चार आरोपींपैकी एक आरोपी अल्पवयीन आहे तर मुख्य आरोपी विशाल अहिरे, दिनेश दवेश गोफणे व राकेश सोमनाथ शिलावट (सर्व रा. लक्ष्मीनगर, शिर्डी) यांचा समावेश आहे. सदरचे कृत्य हे त्यांनी त्यांच्या आपापसातील झालेल्या भांडणातून केले असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे, पोलीस उपनिरीक्षक सागर काळे व पोहेकॉ. संदीप उदावंत, बाळासाहेब गोराणे, केवल राजपूत, शेकडे यांनी या गुन्हाचा उलगडा केला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles