बारामतीत कोणतीही निवडणूक असली, तरी निकाल काय लागणार, हे माहीत असल्याने उमेदवारांना माघार घेण्यासाठी विनवणी करण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. मात्र, या वेळची स्थिती निराळी असून, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची बिनविरोध निवड करण्याची चर्चा सुरू होताच उमेदवारांची संख्या वाढली आहे. थोडेथोडके नव्हे, तर तब्बल ५३ उमेदवार रिंगणात असून, निम्मे उमेदवार हे बारामतीबाहेरील आहेत.
काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे उमेदवारी मागे घेण्यावर ही निवडणूक बिनविरोध होणार की नाही, हे स्पष्ट होणार असले, तरी बाहेरील उमेदवारांपैकी धनंजय मुंडे यांची पत्नी करुणा मुंडे यांचा अर्ज मागे घेण्यासाठीही राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला प्रयत्न करावे लागणार असल्याचे दिसते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. सुरुवातीपासून ही निवडणूक बिनविरोध करण्याची चर्चा सुरू होती. त्यामुळे उमेदवारांची संख्याही वाढत गेली. अर्ज दाखल करण्याची सहा एप्रिल ही अंतिम मुदत होती. तोपर्यंत तब्बल ५५ जणांनी अर्ज दाखल केले. त्यापैकी दोन अर्ज छाननीमध्ये बाद झाल्याने निवडणुकीच्या रिंगणात ५३ उमेदवार राहिले आहेत. त्यामध्ये २३ जण बारामतीतील स्थानिक उमेदवार आहेत.पुणे शहर, दौंड, हवेली आणि इंदापूरमधील प्रत्येकी एक उमेदवार असल्याने पुणे जिल्ह्यातील उमेदवारांची सख्या २७ आहे. अन्य उमेदवार पुणे जिल्ह्याबाहेरील आहेत. त्यांची संख्या २६ आहे. त्यामध्ये धनंजय मुंडे यांची पत्नी करुणा मुंडे यांनी ‘स्वराज्य शक्ती सेना’ या पक्षाच्या उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. तसेच अभिजीत बिचुकले यांनीही अपक्ष अर्ज दाखल केला.
बारामती विधानसभा मतदारसंघाच्या २०२४ मध्ये झालेल्या निवडणुकीत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार उमेदवार होते. तेव्हा ४६ जणांनी अर्ज भरले होते. त्यापैकी चार अर्ज छाननीमध्ये बाद झाले, नऊ जणांनी माघार घेतली. त्यामुळे २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. आता निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.
बारामती पोटनिवडणुकीत निम्मे उमेदवार बाहेरचे! बिनविरोध करण्याचे आव्हान; करुणा मुंडे रिंगणात
- Advertisement -


