बीड :माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळात पुन्हा परतण्याची चर्चा सुरू झाल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी उघड नाराजी व्यक्त केल्याचं दिसून येतंय. मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते, मी ओबीसीमध्ये जन्माला आलो असतो तर संधी मिळाली असती अशी खदखद प्रकाश सोळंके यांनी व्यक्त केली. तसेच गेल्या 45 वर्षांमध्ये बीडमधील मराठा समाजाचा व्यक्ती कॅबिनेट मंत्री आणि पालकमंत्री झाला नाही, बीड हा ओबीसीसाठी राखीव आहे का असा प्रश्नही त्यांनी विचारला.
धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिपदाची संधी मिळत असेल तर माझ्या शुभेच्छा. त्यांना बीडचे पालकमंत्री करावे किंवा राज्य पातळीवरील मोठं पद द्यावं, त्यांना शुभेच्छाच आहेत. गेल्या 45 वर्षात मराठा समाजाचा कॅबिनेट मंत्री आणि पालकमंत्री झाला नाही. बीड जिल्हा ओबीसीसाठी राखीव दिला आहे का?
बीडमध्ये मराठा समाजाला डावललं गेलंय
प्रकाश सोळंके म्हणाले की, “गेली 35 वर्षे मी राजकारणात आहे. या जिल्ह्यात नेतृत्वाने नेहमीच ओबीसींना प्राधान्य दिलं आहे. 1980 साली माझे वडील हे या जिल्ह्याचे कॅबिनेट मंत्री होते, पालकमंत्री होते. त्यानंतर 45 वर्षानंतर या जिल्ह्यात मराठा समाजाला संधी दिली नाही हे दुर्दैवी आहे. मराठा समाज हा सातत्याने राष्ट्रवादीच्या मागे आहे. पण मराठा समाजाला डावलण्याचं काम झालेलं आहे.”
सर्वांना एकत्रित घेऊन राजकारण करण्याची नीती ही पक्षाच्या नेतृत्वाची आहे. पण त्याचवेळी मराठा समाजाला डावलण्याचं कामही त्यांच्याकडून झालं आहे. या आधी आपण पवार साहेब, अजित दादा यांच्याकडे ही खंत व्यक्त केली आहे असंही प्रकाश सोळंके म्हणाले.


