बीड :अंगाची ओली हळद सुकण्यापूर्वीच लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी नवरी माहेरातून प्रियकरासोबत पळून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दि. ९ मे शुक्रवार रोजी केज तालुक्यात एक विवाह सोहळा संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला अनेक जणांची उपस्थिती होती. विवाह सोहळ्यानंतर उपस्थितांनी नवदाम्पत्यांना सुखी संसाराच्या शुभेच्छा दिल्या. पण, यावेळी वधूच्या मनात वेगळेच काही होते.
९ मे रोजी लग्न लागल्यानंतर १० मे रोजी नव दाम्पत्यांनी जोडीने देव दर्शन केले. त्या नंतर दि. ११ मे रोजी तिला मुरळी पाठवून येती-जातीसाठी माहेरी नेण्यात आले. मात्र त्यानंतर तिने रात्री शौचाला जाण्याच्या बहाण्याने भावजईचा मोबाईल घेतला आणि त्याद्वारे आपल्या शेजारच्या गावात राहणाऱ्या प्रियकराशी संपर्क साधला. त्या नंतर ती घरी येऊन झोपी गेली. आणि इतर नातेवाईक अंगणात झोपी गेले. त्या नंतर दि. १२ मे रोजी तिच्या आईला घरातील लाईट बंद असल्याचे आढळून आल्याने तिने घरात जाऊन पाहिले असता ती आढळून आली नाही.मुलीचा शोध घेतला असता ती कुठेच आढळून न आल्याने ओली हळद अंगाला लागलेल्या नवरीच्या भावाने केज पोलीस ठाण्यात बहीण हरवल्याची तक्रार दिली आहे. प्रियकरासोबत पळून जाताना तिने नवऱ्याने लग्नात घातलेले झुंबर, मंगळसूत्र यासह एटीएम कार्ड, क्रेडिट कार्ड आणि मोबाईलसह पोबारा केला आहे.
दुसरीकडे, पतीच्या विवाहबाह्य संबंधामुळे वैवाहिक जीवन उद्ध्वस्त झाल्याची आणखी एक दुर्दैवी घटना पुण्यातून समोर आली आहे. पती आणि त्याच्या प्रेयसीकडून होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून एका विवाहित महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे. ही घटना १० मे रोजी दुपारी घडली.


