बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील एका माजी सरपंचाने आणि कृषी पंप व्यापाऱ्याने तामिळनाडू राज्यात बनावट नोटा चलनात आणण्याचा बेकायदेशीर प्रयत्न केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील थुवाकुडी पोलिसांनी या दोघांना अटक करत तब्बल 8 लाख 37 हजार 800 रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, पुढील तपास आता तामिळनाडू गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आला आहे.
आरोपींमध्ये केज तालुक्यातील माजी सरपंच रमेश बाबुराव भांगे आणि मूळचा राजस्थानचा असलेला कृषी पंप व्यापारी नारायण राम पटेल यांचा समावेश आहे. हे दोघे त्यांच्या खाजगी कारने तामिळनाडूच्या दौऱ्यावर गेले होते. बुधवारी तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील एका पेट्रोल पंपावर इंधन भरताना त्यांनी 200 रुपयांच्या काही नोटा दिल्या. आरोपी निघून गेल्यानंतर पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला नोटांचा कागद व स्पर्श संशयास्पद वाटला. सतर्कता दाखवत त्याने तात्काळ स्थानिक पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी माहिती मिळताच मंजाथिदल चेकपोस्टवर सापळा रचत संबंधित कार अडवली. कारची झडती घेतल्यानंतर पोलिस अधिकारीही थक्क झाले. कारमध्ये 200 रुपयांच्या नोटांचे तब्बल 41 बंडल लपवून ठेवलेले आढळून आले. तपासात या सर्व नोटा बनावट असल्याचे स्पष्ट झाले, ज्यांची एकूण रक्कम 8 लाख 37 हजार 800 रुपये इतकी आहे.


