उपमुख्यमंत्री अजित दादांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणातील एक पर्व संपलं आहे. प्रशासनावर मजबूत पकड असलेला, कडक शिस्तीचा हा नेता आतून किती हळवा आणि माणुसकी जपणारा होता, याचा प्रत्यय आम्हाला 2012 साली आला, असे मत माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे स्वीय सहाय्यक यांनी आपल्या भावना व्यक्त करताना मांडले. त्यावेळी त्यांनी मंत्रालयातील सर्व स्वीय सहाय्यकांच्या पगारवाढी संदर्भातल्या प्रश्नाचा एक अनुभव यावेळी व्यक्त केलाय. त्यावेळी आम्ही आमदारांचे स्वीय सहाय्यक म्हणून नुकतेच रुजू झालो होतो. केवळ 7,825 रुपये इतक्या तुटपुंज्या मानधनावर घर चालवणं अवघड होतं. पगारवाढीचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. ही फाईल जेव्हा अजित दादांकडे आली, तेव्हा त्यांनी जे केलं, ते केवळ दादाच करू शकतात, असे त्यांनी म्हटलं.
विधिमंडळाच्या लॉबीमध्ये सचिवांनी अवघ्या 2 ते 2.5 हजार रुपयांच्या वाढीचा प्रस्ताव मांडला होता. तो प्रस्ताव ऐकताच दादा त्यांच्या खास शैलीत कडाडले “अरे, 10 हजारात काय होतं? ही पोरं कुठे जाणार? थेट 15 हजारांचा प्रस्ताव द्या!” एका क्षणात आमचा पगार दुप्पट झाला. पण त्याहून मोठी गोष्ट म्हणजे, त्या निर्णयाने आम्हाला जगण्याचा आत्मविश्वास आणि कामाचा आत्मसन्मान मिळाला, असे प्रशांत जोशी यांनी म्हटलं.
फडणवीस सरकारच्या काळात सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी वेतन 25 हजार रुपये केलं.महाविकास आघाडी सरकारमध्ये दादांनी पुन्हा पुढाकार घेत हे वेतन 30 हजार रुपये केलं. आणि विशेष म्हणजे, मागील वर्षी अर्थसंकल्पात हे वेतन 40 हजार रुपये करण्याचा त्यांचा ठाम मानस होता. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या होत्या. यावर्षी ते नक्कीच प्रत्यक्षात उतरलं असतं… कारण ते शब्दांचे पक्के दादा होते.
दादा, तुमचे उपकार आमची पिढी कधीच विसरणार नाही, अशी भावनिक पोस्ट प्रशांत जोशी यांनी मांडली .


