Wednesday, October 29, 2025

बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत दारुण पराभव ,ठाकरे गटाची प्रतिक्रिया, ठाकरे ब्रँड हा कधीही संपणार नाही

गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय असलेल्या दी बेस्ट एम्प्लॉईज को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनेलचा दारुण पराभव झाला. ठाकरे बंधूंच्या पॅनेलला 21 पैकी एकही जागा जिंकता आली नाही. हा ठाकरे गट आणि मनसेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी भाष्य केले आहे. बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत भाजपने पैशांचा प्रचंड वापर केला. या पैशासमोर आम्ही हरलो, असे मत सुहास सामंत यांनी व्यक्त केले.

बेस्ट पतपेढी निवडणूक झाली, त्याचा निकाल काल आला. आम्ही दुर्दैवाने हरलो. जे जिंकले त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. गेल्या नऊ वर्षांमध्ये आम्ही बेस्ट पतपेढी ज्या उंचीवर नेऊन ठेवली ती उंची टिकवून ठेवा. बेस्टच्या कर्मचाऱ्यांची सेवा करा, एवढीच विनंती मी करतो, असे सुहास सामंत यांनी म्हटले. या निवडणुकीत हे सगळं कसं काय घडलं, हे माहिती नाही. माझ्याकडे स्वत:कडे बेस्टचे 12 हजार कर्मचारी आहेत. मात्र, गेल्या आठवड्यात पैशांचा प्रचंड ओघ आला. त्यापुढे आम्ही टिकू शकलो नाही. मला वाटलं कर्मचारी पैसे घेऊन मतदान करणार नाहीत. मी बेस्ट वाचवण्यासाठी जे प्रयत्न करतोय, त्यामुळे कर्मचारी माझ्यासोबत राहतील, असे वाटले होते. पण हल्ली ट्रेंडच बदलला आहे. आम्ही पैशांच्या बाबतीत आणि संपर्क साधण्यात कमी पडलो, अशी स्पष्ट कबुली सुहास सामंत यांनी दिली. भाजपने या निवडणुकीत प्रचंड पैसा, अधिकारांचा वापर आणि संपूर्ण यंत्रणा उतरवली होती. साध्या पतपेढीच्या निवडणुकीत भाजप सर्व ताकदीनिशी उतरतो, ही वाखाणण्याजोगी गोष्ट आहे. पण ही चिंतेची गोष्टही आहे, त्यांच्यापासून सावध राहिले पाहिजे. जेव्हा भाजपला कुठली गोष्ट मिळत नाही, तेव्हा अशाप्रकारे सत्तेचा आणि पैशांचा वापर करतात आणि समोरच्याला हतबल करतात, असे सुहास सामंत यांनी म्हटले.

बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीच्यादृष्टीने लिटमस टेस्ट म्हणून पाहिले जात होते. मात्र, ठाकरे बंधूंना 21 पैकी एकही जागा जिंकता आली नाही. याविषयी प्रतिक्रिया विचारली असता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी फार बोलण्यास नकार दिला. ही स्थानिक स्तरावरील छोटी निवडणूक आहे. बेस्टमध्ये कोणती युनियन मजबूत आहे, यावर ही गणितं अवलंबू आहेत. ठाकरे ब्रँड हा कधीही संपणार नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles