उत्तर नगर जिल्ह्याचे जीवनरेखा असलेले भंडारदरा धरण बुधवारी पहाटेच्या सुमारास ओव्हर फ्लो झाले. दरम्यान भंडारदरा धरणातुन २० हजार ७६३ क्युसेकने विसर्ग सुरू आहे. तर निळवंडे धरणात मोठ्या प्रमाणात नवीन पाण्याची आवक होत असुन धरणातील पाणी पातळी नियत्रीत ठेवण्यासाठी निळवडे धरणातुन ८ हजार ६०० क्युसेकने पाणी सोडण्यात आल्याची माहिती जलसंपदा विभागाचे अभियंता प्रविण भांगरे यांनी दिली.
गेल्या आठवड्यात भंडारदरा धरण पाणलोटात पावसाने विश्रांती घेतल्यामुळे १५ आँगस्टला भंडारदरा धरण भरण्याचा विक्रम मोडला होता. परंतु सोमवार पासून भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रात पावासाने दमदार हजेरी लावली, परंतु मंगळवारी घाटघर, भंडारदरा, साम्रद, रतनवाडी, कोलटेभे, उडदावणे परिसरात मुसळधार पाऊस पडत असल्याने भंडारदरा धरणात २४ तासात ७८९ दशलक्ष घनफुट पाण्याची आवक झाली.बुधवारी पहाटेच्या सुमारास भंडारदरा धरण भरून ओव्हरफ्लो झाल्यानंतर धरणातून प्रवरा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले.तर निळवंडे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून जोरदार पावसाच्या सरी बरसत आहे.
या पाण्याबरोबरच कळसुबाई शिखराच्या पर्वत रांगांत मुसळधार पाऊस कोसळत असल्याने कृष्णावंतीचे पाणी आणि निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाचे पाणी असे सर्व पाणी निळवंडे धरणात येत आहे. या पाण्यामुळे निळवंडे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.
तर निळवंडे धरणातून एकूण ८ हजार ६०० क्युसेकने पाणी प्रवरा नदी पात्रात झेपावत आहे.त्यामुळे प्रवरा नदी वाहती बनली आहे. आणि नवीन पाण्याची आवक निळंवडे धरणात वाढत असल्याने निळंवडे धरण लवकरच भरणार असल्याने लाभधारकातील शेतकऱ्यांमधुन समाधान व्यक्त होत आहे
भंडारदरा ;- १०५ मि.मीटर (एकुण १९७६ मि.मीटर), पांजरे :- १०५ मि.मीटर,(२४१८ मि.मीटर), रतनवाडी :- १७० मि.मीटर(एकुण ४११४ मि.मीटर ) , घाटघर ;- १६० मि.मीटर(एकुण ४०२६), वाकी :- २०२ मि.मीटर(एकुण १६७६ मि.मीटर) ,अकोले :- ५६ मि.मीटर,(एकुण ६१३) , निळवंडे :-६३ मि.मीटर,(एकुण ८५० मि.मीटर) पावसाची नोंद झाली आहे.


