भिंगारमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न संसदेत
अहिल्यानगर : प्रतिनिधी
अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघातील भिंगार शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरील तीव्र वाहतूक कोंडी आणि त्यामुळे नागरिकांना भेडसावणाऱ्या गंभीर समस्यांकडे खासदार नीलेश लंके यांनी संसदेत लक्ष वेधले. या महामार्गावरील परिस्थिती अत्यंत चिंताजनक असून तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.
खा. लंके यांनी सांगितले की, पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर यांसारख्या महत्त्वाच्या व्यापारी व औद्योगिक शहरांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग ६१ हा अत्यंत वर्दळीचा मार्ग आहे. मात्र, भिंगार शहरातून जाताना या महामार्गावर सध्या दिवसभर प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. विशेषतः भिंगार सिग्नल चौक आणि भिंगार अर्बन बँक चौक या ठिकाणी जड व सातत्याने होणाऱ्या वाहतुकीमुळे वारंवार वाहतूक ठप्प होत असल्याचे त्यांनी संसदेत नमूद केले.
हा महामार्ग भिंगार कॅन्टोन्मेंट क्षेत्र, बँका, शाळा तसेच दाट लोकवस्तीच्या भागातून जात असल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. वाहतुकीच्या या विस्कळीत अवस्थेमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून पादचारी व दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला आहे. चौकांमध्ये बसवण्यात आलेले दुभाजक आणि इतर तात्पुरते उपाय सध्या अपुरे ठरत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित करण्यासाठी कायमस्वरूपी व ठोस उपाययोजना आवश्यक असल्यावर भर देत, खा. नीलेश लंके यांनी रस्ते व महामार्ग मंत्र्यांना भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाला भिंगार शहरातील या संवेदनशील भागाचे तातडीने सखोल सर्वेक्षण करण्याचे निर्देश देण्याची विनंती केली. तसेच नागरिकांची सुरक्षा आणि वाहतुकीची सुलभता सुनिश्चित करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग ६१ वर भिंगार शहरातून अत्याधुनिक उड्डाण पुलाच्या बांधकामास प्राधान्याने मंजुरी देण्यात यावी, अशी ठोस मागणी त्यांनी संसदेत केली.


