बीडमध्ये क्षीरसागर घराण्यातील सख्ख्या भावांमध्ये राजकीय फूट.
हेमंत क्षीरसागर यांचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित.
शरद पवार गटाला मोठा धक्का.
तब्बल ९ वर्षांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलंय. महायुती तसेच महाआघाडीतील नेत्यांनी कंबर कसली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुतांश पक्षनेतृत्वाने स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार संबंधित पक्षातील नेत्यांना दिले आहेत. दरम्यान, काही ठिकाणी मतभेद होत असल्याने महाआघाडी किंवा महायुतीत फूट पडली असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच बीडमध्ये भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला धक्का बसला आहे.बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे सख्खे बंधू हेमंत क्षीरसागर यांनी भाजपचं कमळ हाती घेण्याचं निश्चित केलं आहे. या पक्षप्रवेशाबाबत त्यांनी स्पष्टता दिली आहे. बीड नगर परिषदेमध्ये क्षीरसागर यांचं कायम वर्चस्व पाहायला मिळालं आहे. राजकीय जीवनात हेमंत क्षीरसागर यांनी त्यांचे बंधू संदीप क्षीरसागर यांची साथ दिली आहे.
मात्र, आता सख्खा भाऊ पक्का विरोधक बनणार आहे, तसेच भावाविरोधात राजकीय मैदानात उभा राहणार आहे. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची साथ सोडून आमदार संदीप क्षीरसागर यांनी वेगळी भूमिका घेतली होती. आता यानंतर आमदार संदीप क्षीरसागर यांचे सख्खे बंधू माजी उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांनी पक्षाची साथ सोडली. तसेच भाजपसोबत जाणार असल्याचं निश्चित केलं आहे.
दरम्यान, बीडमध्ये सख्खा बंधू भावाविरोधात मैदानात उतरल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. संदीप क्षीरसागर यांचे बंधू हेमंत क्षीरसागर यांच्याकडूनच राजकीय आव्हान मिळणार असल्याचं सध्या चित्र दिसत आहे.


