पाथर्डी: पाथर्डी तालुक्यात ठाकरे शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. पक्षाचे विद्यमान तालुकाप्रमुख भगवान दराडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. गेली तीन वर्षे तालुकाप्रमुखपदाची जबाबदारी सांभाळणार्या दराडे यांनी अचानक राजीनामा देताच, आता ते पुढे कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दराडे हे 1988 पासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक राहिले आहेत कार्यकर्त्याच्या भूमिकेतून तालुकाप्रमुखपदापर्यंतचा त्यांचा प्रवास झाला. गेल्या 36 वर्षांपासून त्यांनी सातत्याने पक्षवाढीसाठी कार्य केले असून, राज्य पातळीवरील विविध कार्यक्रमांतून पक्षाची पताका उंचावली. तालुक्यात शिवसेना मजबूत करण्यासाठी त्यांनी वेळोवेळी महत्त्वाचे योगदान दिले. गेल्या तीन वर्षांत पक्षाने त्यांच्यावर टाकलेली तालुकाप्रमुखपदाची जबाबदारीही त्यांनी पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, घरगुती कारणास्तव, तसेच राजकीय वादविवादांना दूर ठेवण्यासाठी हे पद सोडत असल्याचे त्यांनी राजीनाम्यात नमूद केले आहे.
दराडे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा नेते आदित्य ठाकरे, तसेच जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सुनील शिंदे यांना पत्र पाठवून आपला राजीनामा सादर केला आहे. राजीनामा पत्रात त्यांनी म्हटले आहे की, माझ्या घरगुती कारणास्तव व राजकीय वादविवाद टाळण्यासाठी तसेच पक्षाला वेळ देता येत नाही, म्हणून तालुकाप्रमुखपदाचा राजीनामा देत आहे.
दराडेंच्या या निर्णयामुळे तालुक्यातील ठाकरे गटाची संघटनात्मक ताकद कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक पातळीवर शिवसैनिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर पक्षात नवीन तालुकाप्रमुख कोण होणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
दराडे यांनी घेतलेला निर्णय हा फक्त घरगुती कारणामुळे आहे की यामागे काही राजकीय घडामोडी दडलेल्या आहेत, यावरही सध्या चर्चा आहे. दराडे हे अनुभवी आणि संघर्षशील नेते असल्याने त्यांची पुढील राजकीय दिशा कोणती असेल, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून त्यांच्याबरोबर अनेक शिवसैनिक पक्ष सोडण्याच्या मार्गावर आहे अशी ही चर्चा सध्या सुरू आहे.


