Wednesday, November 5, 2025

पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या नातेवाईकांना 50 लाख आणि सरकारी नोकरी, देवेंद्र फडणवीसांच्या कॅबिनेटचा मोठा निर्णय

जम्मू-काश्मिरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये २७ पर्यटकांचा मृत्यू झाला. या मृतांमध्ये ६ महाराष्ट्रातील नागरिकांचा समावेश आहे. या हल्ल्यामुळे संपूर्ण देशाला मोठा हादरला बसला आहे. या हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना महाराष्ट्र सरकारने मोठं आर्थसहाय्य केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत मोठी घोषणा केली. पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाख रुपये आणि कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये पहलगाम हल्ल्यामध्ये मृत्यू झालेल्या महाराष्ट्रातील ६ जणांच्या कुटुंबीयांना अर्थसहाय्य करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीमध्ये पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाख रुपये आणि कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याची घोषणा केली. मृतांच्या कुटुंबीयांच्या शिक्षण आणि रोजगाराकडे राज्य सरकार लक्ष देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

पहलगाम हल्ल्यातील मृतांना राज्य मंत्रिमंडळ बैठकीत भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. महाराष्ट्रातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाख रुपये अर्थसहाय्य देण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली. मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले की, ‘या कुटुंबांच्या शिक्षण, रोजगाराकडे राज्य सरकार लक्ष देणार आहोत. जगदाळे कुटुंबातील मुलीला नोकरी देण्यासाठी आपण कालच बोललो होतो. पण आता मुख्यमंत्र्यांचा विशेषाधिकार वापरत त्यांना आता शासकीय नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.’

दरम्यान, २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हल्ला करत २७ पर्यटकांचा जीव घेतला होता. यामध्ये महाराष्ट्रातील ६ पर्यटकांचा समावेश होता. दहशतवाद्यांनी धर्म विचारत या सर्वांची गोळ्या झाडून हत्या केली होती. पुण्यातील कौस्तुभ गनबोटे, संतोष जगदाळे या मित्रांचा मृत्यू झाला. डोंबिवलीमधील अतुल मोने, हेमंत जोशी, संजय लेले या तिघांचा मृत्यू झाला होता. तर पनवेल येथील दिलीप देसले यांचा देखील पहलगाम हल्ल्यात मृत्यू झाला. या सर्व सहा जणांच्या कुटुंबीयांना आता महाराष्ट्र सरकारने मदत जाहीर केली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles