Friday, October 31, 2025

‘एमपीएससी’ची राज्यसेवा मुख्य परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात मोठा निर्णय…

राज्यात मराठा आरक्षण लागू झाल्यावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ साठी सुधारित अर्ज करताना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गातील (एसईबीसी) काही उमेदवारांनी ‘नॉन क्रिमिलेअर’ प्रमाणपत्राची माहिती न दिल्याने त्यांचे सुधारित अर्ज बाद ठरले. यामुळे असे उमेदवार ‘ईडब्ल्यूएस’ प्रवर्गातच राहिले. आयोगाने हा गुंता सोडवण्यासाठी पूर्व परीक्षेचा सुधारित निकाल जाहीर करून ३१८ नवीन ‘ईडब्ल्यूएस’ उमेदवारांना अर्जाची संधी दिली.

तर मुख्य परीक्षेचा अर्ज करताना ‘एसईबीसी’ उमेदवारांना नॉन क्रिमिलेअर’ प्रमाणपत्र ‘आहे’ किंवा ‘नाही’ हा दावा करण्याची पुन्हा संधी दिली. मुख्य परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची मुख्य परीक्षा ही २६ ते २८ एप्रिल दरम्यान होणार आहे. नुकताच ३१८ उमेदवारांचा निकाल जाहीर झाल्याने त्यांना अभ्यासासाठी अधिकचा वेळ मिळावा अशी मागणी होत आहे. परंतु, आयोगाने यासंदर्भात मोठा निर्णय घेतला असून परीक्षार्थींसाठी महत्त्वाची सूचना दिली आहे. मंगळवारी आयोगाची महत्त्वाची बैठक पार पडली असून यावेळी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
आयोगाची महत्त्वाची सूचना काय?

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ च्या प्रवेशाकरीता पात्र उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी संदर्भिय ४ एप्रिल २०२५ रोजीच्या शुध्दीपत्रकान्वये ९ एप्रिल २०२५ रोजीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. तांत्रिक अडचणीमुळे अर्ज सादर करण्यास अडथळा निर्माण असल्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात काही उमेदवारांकडून विविध माध्यमातून मागणी होत असल्याचे आयोगाच्या कार्यालयाच्या निदर्शनास आले आहे. विषयांकित परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र एकूण ७९७० उमेदवारांपैकी मंगळवारपर्यंत रोजी दुपारी ३.०० वाजेपर्यंत एकूण ७७३२ उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत. उर्वरित पात्र उमेदवारांना अर्ज सादर करण्याकरीता ऑनलाईन अर्जप्रणाली सुरळित सुरू असून उमेदवारांकडून अर्ज सादर केले जात आहेत.

तसेच अर्ज सादर करण्यासंदर्भातील उमेदवारांच्या अडचणी / शंकांचे निराकरण सुविधा केंद्र (हेल्पडेस्क) व आयोगाच्या कार्यालयाकडून केले जात आहे. ज्या उमेदवारांना अर्ज करताना अडचणी /शंका असतील अशा उमेदवारांनी सुविधा केंद्राच्या दूरध्वनी क्रमांक ७३०३८२१८२२ व ०२२६९१२३९१४ वर किंवा आयोगाच्या कार्यालयाच्या contact-secretary@mpsc.gov.in या ईमेलवर संपर्क करुन आवश्यक मदत प्राप्त करुन घेता येईल, असे कळवण्यात आले आहे.
बैठकीत परीक्षा पुढे ढकलण्यावर काय ठरले?

राज्यसेवा मुख्य परीक्षा २६ ते २८ एप्रिल दरम्यान होणार आहे. परंतु, ही परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी होत आहे. परंतु, यासंदर्भात बैठक घेण्यात आली. यात आतापर्यंत सर्वच विद्यार्थ्यांनी अर्ज केले असून कुठलीही तांत्रिक अडचण नाही. केवळ २०० विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले नाही. त्यामुळे त्यांना तांत्रिक अडचणी असल्यास सांगावे असेही कळवण्यात आले.

प्रस्तुत प्रसिध्दीपत्रकाद्वारे उमेदवारांना आवाहन करण्यात येते की, राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ च्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांनी विहित कालावधीतच अर्ज सादर करण्याची तसेच परीक्षा शुल्क भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी. विहित मुदतीनंतर अर्ज सादर करण्यासंदर्भातील अथवा परीक्षा शुल्काचा भरणा करण्यासंदर्भातील कोणत्याही विनंतीचा विचार करण्यात येणार नाही, अशा सक्त सूचना देण्यात आल्याने परीक्षा पुढे ढकलली जाणार नाही, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles