मुंबईतील बिहार भवनाला विरोध करणारे फालतू आणि विकृत मानसिकतेचे लोक आहेत. मुंबईत बिहार भवन उभारु देणार नाही, असे हे लोक म्हणतात. महाराष्ट्र कोणाच्या बापाचा आहे का? या देशात कुठेही कोणाचीही जबरदस्ती चालणार नाही. मुंबईत कोणत्या राजाची राजवट आहे का, राज ठाकरे (Raj Thackeray) हे काय तिकडचे राजे लागून गेले आहेत का? आम्ही कोणत्याही परिस्थितीत मुंबईत बिहार भवन (Bihar Bhavan) उभारणारच, असे वक्तव्य बिहार सरकारमधील मंत्री अशोक चौधरी (Anil Choudhary) यांनी केले आहे. मुंबईतील बिहार भवन हे एका भावनेतून उभारले जात आहे. बिहारमधून अनेक लोक कॅन्सर व अन्य रोगांच्या उपचारासाठी मुंबईत जातात. त्या लोकांच्या सोयीसाठी हे बिहार भवन बांधले जात आहे. अनेक राज्यांमध्ये बिहार भवन आहे. त्याप्रमाणे मुंबईतही बिहार भवन बांधले जाईल, असे अशोक चौधरी यांनी म्हटले.
अशोक चौधरी यांच्या या टीकेला मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अशोक चौधरी यांनी आधी आपले स्वत:चे राज्य सांभाळावे. दुसऱ्यांना अक्कल शिकवू नये. स्वत:ची राज्य नीट ठेवलीत तर तुमचे लोक बाहेर जाणार नाहीत. देशभरात बिहारबद्दल काय बोललं जातं, हे एकदा अशोक चौधरी यांनी जाणून घ्यावे. महाराष्ट्र हा मराठी माणसाचा आहे. देवाने तोंड दिलंय म्हणून काहीही बोलू नये, असे अविनाश अभ्यंकर यांनी म्हटले.
दक्षिण मुंबईतील पोर्ट ट्रस्टच्या जागेवर 30 मजली बिहार भवन उभारण्याची योजना आहे.


