धुळे: दोंडाईचा वरवाडे नगरपरिषदेच्या निवडणुकीत मोठा राजकीय उलथापालथ झाली असून भाजपच्या उमेदवार नयनकुवर रावल यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. त्या राज्याचे मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री असून भाजपकडून नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार होत्या.यासोबतच भाजपचे आणखी सात नगरसेवकही बिनविरोध निवडून आल्याने दोंडाईचा नगरपरिषद निवडणुकीत भाजपचे वर्चस्व कायम राहिले आहेत.या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार शरयू एकनाथ भावसार यांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यांच्या कुटुंबीयांवर महानगरपालिकेचा कर थकवल्याचा आरोप करत भाजपकडून त्यांच्या उमेदवारीवर हरकत घेण्यात आली होती. त्यावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दुपारी पाच वाजण्याची वेळ दिली होती.
हरकतीनंतर शरयू भावसार यांनी निवडणूक अधिकाऱ्यांसमोर आपली बाजू मांडली, मात्र निकाल हा भाजपपक्षाच्या बाजूने लागला, आणि नयनकुवर रावल यांची बिनविरोध निवड झाली.या राजकीय घडामोडींमुळे दोंडाईचा नगरपरिषदेवर भाजपने निर्विवाद पकड निर्माण केली असून, महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.
भाजप शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गट हे मित्रपक्ष राज्यात महायुती म्हणून सत्तेत असले तरी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठिब मात्र युती झालेली नाहीये. यामुळे महायुतीतील मित्र असलेल्या जवळपास या सर्व पक्षांनी स्वतंत्र उमेदवार दिले आहेत. या अनुषंगाने जिल्ह्याचे पालकमंत्री रावल यांनी रणनीती आखत आपले वर्चस्व कायम ठेवले.


