राणे कुटुंबीयांचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या मतदारसंघात भाजपने मोठी कारवाई केली आहे. भाजपने नगराध्यक्षांसह ६ नगरसेवकांचं भाजपमधून निलंबन केलं. भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी नोटीस बजावली आहे. पक्षशिस्तभंग केल्याने निलंबनाची कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिंधुदुर्गातील कुडाळ नगरपंचायतमधील भाजपच्या आठपैकी ६ नगरसेवकांना शिस्तभंग केल्याने भारतीय जनता पक्षातून निलंबित करण्यात आल्याची नोटीस भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी बजावली आहे. भाजप जिल्ह्याध्यक्षांनी नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांच्यासह नयना मांजरेकर, अभिषेक गावडे, विलास कुडाळकर, राजीव कुडाळकर आणि चांदणी कांबळी या भाजपच्या नगरसेवकांचा समावेश आहे.
भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन हे सहा नगरसेवक भाजपमधून निवडून आले होते. ते पक्षविरोधी कारवाई करीत असल्याने त्यांच्यावर पक्षातर्फे निलंबनाची कारवाई करण्यात येत आहे असे पत्राद्वारे कळवले. तसेच त्यांच्याबाबत योग्य आदेश निर्गमित करावा असे पत्रात नमूद केले आहे.
निलंबनाच्या कारवाईमुळे सिंधुदुर्गातील महायुतीत खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची थेट मुख्यमंत्र्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर आता शिंदेंच्या शिवसेनेच्या जवळीक साधलेल्या सहा नगरसेवकांना निलंबित केलंय. त्यामुळे महायुतीत पुन्हा धुसफूस सुरू झाल्याचे चित्र आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आलाय. जिल्ह्यातील अंतर्गत रस्त्यांवर सर्वत्र खड्डेच खड्डे पडलेले दिसून येत आहेत. या खड्ड्याच्या प्रश्नावरून सावंतवाडी तालुक्यात ठिकठिकाणी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना जाग आणण्यासाठी उपरोधिक भाष्य करणारे बॅनर लावण्यात आलेत. ‘आपण चंद्रावर प्रवास करत आहात. जरा संभाळून प्रशासन गाढ झोपलंय, अशा आशयाचे हे बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत.


