‘बॉर्डर’ सिनेमा १९९७ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. साधारण २८ वर्षांपूर्वी या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. आता एका नव्या स्टारकास्टसह ‘बॉर्डर २’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचं पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं होतं. आता या पाठोपाठ या सिनेमाचा टीझर लॉन्च सोहळा पार पडला आहे. २ मिनिटं ५ सेकंदाच्या टीझरने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यातील जबरदस्त डायलॉग, दमदार कलाकार, अॅक्शन यामुळे शेवटपर्यंत हा टीझर प्रेक्षकांना खिळवून ठेवतो.
टीझरच्या सुरुवातीलाच स्क्रीनवर ‘भारत-पाकिस्तान युद्ध १९७१’ असं पाहायला मिळतं. यानंतर सनी देओलचे दमदार संवाद टीझरमध्ये ऐकायला मिळतात. “तुम्ही भारतात कोणत्याही मार्गाने येण्याचा प्रयत्न करा… मग ते आकाश असो किंवा पाणी…प्रत्येक जागी तुमचा सामना करण्यासाठी भारतील सैनिक उभा असेल”
‘बॉर्डर २’मध्ये सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत. यासह मोना सिंग, सोनम बाजवा, मेधा राणा आणि अन्या सिंग या अभिनेत्रींची झलक देखील टीझरमध्ये पाहायला मिळत आहे. या टीझरचा शेवट सुद्धा सनी देओलच्या जबरदस्त डायलॉगने होतो.
सनी देओल सर्वांना विचारतो, “आवाज कहा तक जानी चाहिए…” यानंतर सगळे सैनिक म्हणतात, “लाहोर तक!” ( लाहोरपर्यंत आपला आवाज पोहोचला पाहिजे ) पुढे, ‘हिंदुस्तान मेरी जान’ या गाण्यांच्या ओळींनी या टीझरचा शेवट होताना दिसतो. या गाण्याने २८ वर्षांपूर्वी देखील प्रत्येकाची मनं जिंकून घेतली होती.
आज हा टीझर प्रदर्शित करण्यामागे खास कारण आहे. ते म्हणजे, १६ डिसेंबर हा दिवस ‘विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो. १६ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय सैन्यासमोर शरणागती पत्करली होती. आपण या युद्धात विजयी झालो. भारतीय सेना, नौसेना, वायुसेनेच्या इतिहासात भारत-पाक युद्धात हा आपला सर्वात मोठा लक्षणीय व निर्णायक विजय होता.
दरम्यान, ‘बॉर्डर २’ हा सिनेमा २३ जानेवारी २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर कसं यश मिळवणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.


