Wednesday, October 29, 2025

सातबाऱ्यावर नोंदीसाठी मागितली लाच, अहिल्यानगर जिल्ह्यात ग्राम महसूल अधिकारी पकडला रंगेहात

पारनेर – जमिनीच्या खरेदीखताची सातबारा उताऱ्यावर नोंद लावण्यासाठी तक्रारदाराकडे १० हजारांची लाच मागून तडजोडी अंती ८ हजार रुपये पंचांसमक्ष स्विकारताना वाडेगव्हाण (ता. पारनेर) येथील ग्राम महसूल अधिकारी (कामगार तलाठी) दिपक भिमाजी साठे (वय ३६, रा. हंगा, ता. पारनेर) यास नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. त्याच्या विरोधात सुपा पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची माहिती अशी की, यातील तक्रारदार यांनी त्यांचा मुलगा आणि २ पुतणे यांच्या नावावर १ एकर २० गुंठे शेतजमीन त्यांच्या चुलत भावाकडून खरेदी केली होती. सदर खरेदी खताचे फेरफार मुलाच्या व पुतण्यांच्या नावाची नोंद सातबारा उताऱ्यावर लावण्यासाठी तक्रारदार हे वाडेगव्हाण (ता. पारनेर) येथील ग्राम महसूल अधिकारी (कामगार तलाठी) दिपक भिमाजी साठे यांच्या कडे गेले. त्यावेळी साठे याने कुरुंद गावचा कार्यभार दुसऱ्या तलाठ्याकडे गेला आहे. मात्र त्यांना अजून डिजिटल सिग्नेचर प्राप्त झालेली नसल्याने तुमचे काम मीच करणार आहे. त्यासाठी साठे याने तक्रारदाराला १० हजार रुपयांची लाच मागितली.

याबाबतची तक्रार १७ सप्टेंबर रोजी नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला प्राप्त झाली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने १७ सप्टेंबर रोजीच वाडेगव्हाण तलाठी कार्यालय येथे लाच मागणी पडताळणी करत सापळा लावला. त्यावेळी तलाठी साठे हा तक्रारदाराकडून तडजोडी अंती ८ हजारांची लाच मागणी करून ती पंचांसमक्ष स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आला. त्याच्या विरुद्ध रात्री उशिरा सुपा पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलिस उपअधिक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राजू आल्हाट, पोलिस अंमलदार चंद्रकांत काळे, शेखर वाघ, किशोर कुळधर, चालक दशरथ लाड यांच्या पथकाने केली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles