भाजपची पुण्यात महत्वाची बैठक झाली. भाजप कार्यकर्ता संवाद बैठकीला पुणे जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. भाजपच्या बैठकीत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप पदाधिकऱ्यांना मोलाचा सल्ला दिला. ‘काँग्रेसला फोडा आणि काँग्रेसला रिकामी करा, असा कानमंत्र भाजप प्रदेशाध्यक्ष, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना दिला. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सल्ल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपच्या पुणे पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिला. ‘काँग्रेसची लोकं आपल्याकडे आली तरी तुमचा आधी विचार करणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात दोन दिवस मंत्री वेळ देणार आहेत, असं आश्वासन बावनकुळे यांनी पदाधिकाऱ्यांना दिलं. तुम्ही घाबरू नका,असा सल्ला देखील बावनकुळे यांनी भाजप पदाधिकऱ्यांना दिला.
पुण्यात बैठकीला आलेल्या मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांच्या एका वक्तव्याचा समाचार घेतला. ‘पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत. त्यांच्याकडेही अणुबॉम्ब आहे, असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांनी केलं होतं. फारुक अब्दुला यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले,’ त्यांचं वक्तव्य अत्यंत चुकीचे आहे. या देशातील लोक हे वक्तव्य स्वीकारणार नाहीत. पाकिस्तानचा बदला मोदी घेतील. संपूर्ण देशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाजूने आहे’.
काँग्रेस नेत्यांच्या भाजप प्रवेशावर भाष्य करताना बावनकुळे म्हणाले, ‘काँग्रेसला लोक सोडून चालले आहेत. संग्राम थोपटे यांनी सगळं काँग्रेसला दिलं. तरी सुद्धा त्यांना पक्ष सोडावा लागला. त्यांना काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्याकडून अपेक्षा नाहीत. काँग्रेसला कुठलं ही धोरण नाही. जो-जो काँग्रेस किंवा इतर पक्षामधून आमच्याकडे येईल, त्याचे स्वागत आहे. तुम्ही थकून जाल, इतके जण आमच्याकडे येत आहेत’.


