अहिल्यानगर- पुणे महामार्गावर चास (ता. अहिल्यानगर) शिवारात गुरूवारी (4 सप्टेंबर) पहाटे भीषण अपघात झाला. भरधाव वेगातील खासगी आरामबसने ट्रॅक्टरला धडक दिल्याने ट्रॅक्टर ट्रॉली पलटी होवून त्यातील दोन मजूरांचा मृत्यू झाला असून तिघे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नगरमधील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.या अपघातात शमीम अख्तर (रा. बिहार) व इनारूल शेख (रा. पश्चिम बंगाल) या दोघांचा मृत्यू झाला आहे. तर जखमींची नावे समजू शकली नाहीत. मयत व जखमी हे पाचही जण परप्रांतीय असून मजुरी काम करण्यासाठी अहिल्यानगर तालुक्यात आलेले होते. ते पहाटेच्या सुमारास कामावर जाण्यासाठी चास कडून अहिल्यानगरकडे ट्रॅक्टर- ट्रॉली घेवून येत होते, पहाटे चासच्या पुढे जयेश हॉटेल जवळ आले असता पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या खासगी आराम बसने त्यांना ओहरटेक करत असताना अचानक वळण घेतले, त्यामुळे बसची ट्रॅक्टरला धडक बसून ट्रॅक्टर- ट्रॉलीसह पलटी झाला.
त्याखाली दबून दोघांचा मृत्यू झाला तर तिघे जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच अहिल्यानगर तालुका पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नागरिकांच्या मदतीने जखमींना रूग्णवाहिका बोलावून उपचारासाठी रूग्णालयात पाठविले तर मयतांचे मृतदेह शवविच्छेदना साठी जिल्हा शासकीय रूग्णालयात पाठविले. तसेच अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली. या प्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.


