अहिल्यानगर जिल्ह्यात राहुरी तालुक्यातील तांभेरे येथील एका भुसार मालाच्या व्यापार्यांची गाडी सायंकाळच्या सुमारास रस्त्यात अडवून त्यांना दुसर्या चारचाकीत बसवून अपहरण करण्यात आले. त्यानंतर सदर व्यापार्याला लाकडी दांड्याने मारहाण करून त्यांना व त्यांच्या कुटुंबाला जिवे ठार मारण्याची धमकी देत एक कोटीची खंडणी मागण्यात आली आहे.बापूसाहेब रामदास गागरे, (वय 39) राहुरी तालुक्यातील तांभेरे येथे राहतात आणि ते भुसार मालाचा व्यवसाय करतात. दि. 13 ऑक्टोबर रोजी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बापुसाहेब गागरे हे त्यांची अशोक लेलँड चारचाकी गाडी घेऊन तांभेरे येथून राहाता तालुक्यातील वाकडी येथे जात होते. त्यावेळी एका पांढर्या रंगाच्या चारचाकी वाहनाने त्यांचा पाठलाग करत ते वाहन त्यांच्यामागे गेले. बापूसाहेब गागरे हे वाकडी रस्त्याला निळवंडे कालव्याच्या पाठीमागे रोडने जात असताना आरोपींनी त्यांची गाडी अडवून त्यांना थांबवले. तेव्हा आरोपी गागरे यांना म्हणाले, तुझ्या जवळच्या माणसाने तुझी सुपारी दिलेली आहे. तुला गोळ्या घालायला वेळ लागणार नाही. तू गुपचूप आमच्या गाडीत बस. असे म्हणून आरोपींनी गागरे यांना लोखंडी कत्तीचा धाक दाखवून बळजबरीने त्यांच्या गाडीत बसवून गागरे यांचे अपहरण केले.आरोपी त्यांना श्रीरामपूरच्या दिशेने एका निर्जन ठिकाणी असलेल्या गोडाऊनमध्ये घेऊन गेले. तेथे गागरे यांना मारहाण करून एक कोटी रुपयांची खंडणी मागितली. तेव्हा गागरे यांनी दहा लाख रुपये देतो, असे सांगितले. त्यानंतर गागरे यांनी त्यांच्या एका मित्राला फोन करून पैशाची मागणी केली. तेव्हा मित्र म्हणाला की, तू समक्ष आल्यावरच मी रक्कम देईन, असे त्याने सांगितले. त्यानंतर तीन ते चार आरोपींनी गागरे यांना लाकडी दांड्याने मारहाण केली आणि जर तू पैसे दिले नाहीस किंवा पोलीस स्टेशनला गेला, तर तुला व तुझ्या कुटुंबाला जिवे ठार मारेल, अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपींनी गागरे यांच्या डोळ्याला पट्टी बांधून त्यांना चारचाकी वाहनात बसवून राहुरीतील शनिशिंगणापूर फाट्याच्या आसपास सोडले.
दि. 27 ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास गागरे हे त्यांच्या घरी असताना एका नंबरवरून व्हॉट्सअॅप कॉल आला.
त्यावेळी सदर इसमाने गागरे यांना शिवीगाळ व धमकी देऊन म्हणाला की, तू अद्यापपर्यंत 10 लाख रुपये दिले नाहीस. ते कधी देणार आहेस? जर तू पैसे दिले नाहीस तर तुला व तुझ्या कुटुंबाला ठार मारून टाकू, अशी धमकी दिली. तसेच तुझ्या कागदपत्रांची पिशवी माझ्याकडे आहे. ती तुला परत देणार नाही, असे सांगून फोन कट केला. याप्रकरणी बापूसाहेब रामदास गागरे राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली. त्या फिर्यादीवरून अज्ञात पाच जणांवर गु.र.नं. 1163/2025 भारतीय दंड संहिता कलम 140 (2), 308 (3), 308 (4), 308 (5), 115 (2), 351 (2), 352, 3 (5) प्रमाणे अपहरण, खंडणी, मारहाण व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


