निवासी शाळेतील आठवीतील मुलांना मारहाण प्रकरण
अकरा शिक्षकांना नोटीसा खुलासे दिले आता लक्ष चार सदस्यीय समितीच्या अहवालावर विभागीय आयुक्तांच्या निर्णयाकडे
जामखेड (प्रतिनिधी – नासीर पठाण )
जामखेड – अनुसूचित जाती-जमाती नवबौद्ध शासकीय निवासी मुलांच्या शाळेतील आठवीच्या विद्यार्थ्यांना मारहाण प्रकरणी सहा विद्यार्थ्यांना शाळेतून काढण्यात आले. निवासी शाळेत घडलेल्या प्रकारावरून सहाय्यक आयुक्त यांनी सर्व अकरा स्टाफ यांना नोटीस देऊन खुलासा मागितला होता. या
सर्वांनी खुलासा दिला. तसेच सुरक्षा तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांचे कंत्राट असणाऱ्या क्रीस्टाईल या कंत्राटदाराला नोटीस देऊन कारवाई करा असे निर्देश दिले आहेत. चार सदस्यीय समितीचा अहवाल विभागीय आयुक्तांना दिला आहे ते दोन दिवसात कारवाईचा निर्णय जाहीर करणार आहेत. त्यामुळे या घटनेकडे संपूर्ण जिल्ह्य़ाचे लक्ष लागले आहे.
शासकीय निवासी शाळेतील इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांना नववीच्या विद्यार्थ्यांनी लाथाबुक्क्याने व पट्ट्याने झालेल्या अमानुष मारहाणीची घटना व्हिडीओ व्हायरल झाल्याने उघडकीस आली व यानंतर मंत्रालय मधून सुत्रे हलली. समाज कल्याण विभागाने तात्काळ दखल घेऊन सहायक आयुक्त प्रवीण कोरगंट्टीवार जामखेड येथील निवासी शाळेवर आले.
त्यांनी घडल्या प्रकरणाची माहिती घेऊन विभागीय आयुक्तांना माहीती दिली त्यांच्या आदेशानुसार तीन विद्यार्थ्यांना तात्काळ शाळेतून काढून त्यांच्या पालकांना दाखले दिले. तपासाअंती आणखी तीन विद्यार्थ्यांचा सहभाग आढळला त्यामुळे त्यांना शाळेतून काढण्यात आले.
मारहाण करणाऱ्या सहा विद्यार्थ्यांना शाळेतून काढले. तसेच
सदर घटना घडल्याबद्दल या निवासी शाळेतील अधिक्षक, मुख्याध्यापक सह शिक्षकासमवेत सर्व अकरा जणांना कारणे दाखवा नोटीस देऊन खुलासा मागितला व त्यांनी चा खुलासा दिला. सदर घटना घडली कशी व त्यास कोण जबाबदार आहे याबाबत सहायक आयुक्त कोरगंट्टीवार यांनी चार सदस्यीय चौकशी समिती नियुक्त केली. चौकशी करून त्याच दिवशी गुरुवार दि. 23 रोजी अहवाल देण्यास सांगितले. सदर समितीने सर्व शिक्षक, सुरक्षा कर्मचारी, विद्यार्थी तसेच घटना घडली त्या ठिकाणची पाहणी करून चार तासांच्या चौकशीनंतर समितीने सहाय्यक आयुक्त यांना अहवाल दिला.
चार सदस्यीय समितीचा अहवाल त्यांनी विभागीय समाजकल्याण अधिकारी यांना शुक्रवारी पोहच केला आहे. यामध्ये कोण दोषी आहेत यावर दोन दिवसात निर्णय देणार आहे.
जामखेड येथील निवासी शाळेत झालेल्या रॅगिंग प्रकरणाची शिवसेना (उबाठा), वंचित बहुजन आघाडी व इतर अनेक संघटनांनी उडी घेऊन अधिक्षक, मुख्याध्यापक व शिक्षकावर कारवाई न केल्यास आंदोलन इशारा दिला आहे. सहाय्यक आयुक्त प्रवीण कोरगंट्टीवार यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून सहा विद्यार्थ्यांना शाळेतून काढले व चार सदस्यीय चौकशी समिती नियुक्त केली या घेतलेल्या झटपट निर्णयामुळे आंदोलनाची धार कमी केली. विभागीय आयुक्तांच्या निर्णय काय येतोय याकडे या राजकीय पक्ष व संघटनेचे लक्ष लागून राहिले आहे.


