Tuesday, October 28, 2025

वैद्यकीय क्षेत्रात खळबळ….नगर शहरातील सहा नामांकित डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल

घशाच्या त्रासासाठी रुग्णालयात दाखल झालेल्या वृद्धाला करोना पॉझिटिव्ह नसतानाही खोटे रिपोर्ट बनवून चुकीचे उपचार दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर शरिरातील अवयवांची तस्करी करण्यासाठी व पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाच्या आदेशावरून शनिवारी तोफखाना पोलीस ठाण्यात अहिल्यानगर शहरातील सहा नामांकित डॉक्टरांसह अनोळखी कर्मचार्‍यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी मयत वृद्धाचे पुत्र अशोक बबनराव खोकराळे (वय 47, रा. सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे. या घटनेने अहिल्यानगरच्या वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. डॉ. गोपाळ बहुरुपी, डॉ. सुधीर बोरकर (रा. पाईपलाईन रस्ता, सावेडी), डॉ. सचिन पांडुळे, डॉ. अक्षयदीप झावरे, डॉ. मुकुंद तांदळे (सर्व रा. नगर) आणि एका लॅब तज्ज्ञ डॉक्टरसह इतर कर्मचार्‍यांवर हा गुन्हा दाखल झाला आहे. कटकारस्थान, फसवणूक आणि मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप करण्यात आला आहे.फिर्यादीनुसार, अशोक खोकराळे यांचे वडील बबनराव खोकराळे (वय 79) यांना 13 ऑगस्ट 2020 रोजी घशात खवखव आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होत होता. त्यांना डॉ. पांडुळे यांच्या पटियाला हाऊस येथील कोविड सेंटरमध्ये दाखल केले.त्यावेळी वडिलांचे सर्व रिपोर्ट नॉर्मल असूनही त्यांना निरीक्षणाखाली ठेवले. दुसर्‍या दिवशी 14 ऑगस्ट रोजी फिर्यादीला न कळवताच बबनराव यांना डॉ. बहुरुपी आणि डॉ. बोरकर यांच्या न्युक्लिअस हॉस्पिटलमध्ये परस्पर हलवण्यात आले. न्युक्लिअस हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर बबनराव यांनी मुलगा अशोक आणि अरविंद यांना फोन करून, हे लोक मला मारून टाकतील, मला बेडला बांधून ठेवतात, खूप रक्त काढले, मला इथून घेऊन जा, अशी विनवणी केली. फिर्यादीने भेटण्याचा प्रयत्न केला असता त्यांना अडवण्यात आले.

डॉक्टरांनी आधी रुग्ण नॉर्मल आहे असे सांगितले, मात्र त्यानंतर ते करोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगून डिस्चार्ज देण्यास टाळाटाळ केली. 18 ऑगस्ट 2020 रोजी फिर्यादीला वडिलांच्या मृत्यूची बातमी मिळाली. हॉस्पिटलने 1 लाख 84 हजार रुपयांचे बिल भरण्यास सांगितले. बिल भरल्यानंतर, मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलला पाठवल्याचे सांगितले. मात्र, फिर्यादीने सिव्हिल हॉस्पिटल, अमरधाम आणि न्युक्लिअस हॉस्पिटलमध्ये शोधाशोध करूनही वडिलांचा मृतदेह आजपर्यंत सापडलेला नाही, असे फिर्यादीत नमूद आहे. फिर्यादीने याप्रकरणी उच्च न्यायालयात धाव घेतली. जिल्हा शल्यचिकित्सकांनी नेमलेल्या समितीने देखील डॉक्टरांनी गैरव्यवहार, निष्काळजीपणा, आणि हलगर्जीपणा केल्याचा अहवाल न्यायालयात सादर केला. अखेर, 18 ऑक्टोबर 2025 रोजीच्या उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

करोना नसताना खोटे आरटीपीसीआर रिपोर्ट बनवले. पैसे उकळण्यासाठी जाणीवपूर्वक चुकीचे उपचार दिले. रुग्णाला बेडला बांधून ठेवले, धमकावले आणि जेवणही दिले नाही. एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचार दाखवून बिले उकळली. पुरावा नष्ट करण्यासाठी आणि अवयव तस्करीच्या हेतूने मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावली, असे गंभीर आरोप फिर्यादीत करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक आनंद कोकरे करत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles