पुणे : राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ५ कोटींच्या कर्जासाठी बनावट स्टॅम्प पेपर वापरल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्टॅम्प पेपरचे बनावटीकरण करुन बनावट दस्त बनवून हा दस्त खरा असल्याचं भासवून फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. करण दीपक मानकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलांवर बलात्कार करणाऱ्या आरोपी शंतनू कुकडे याच्याकडून ५० लाख रुपये घेतले असल्याचं देखील समोर आलं आहे. समर्थ पोलीस ठाण्यात या प्रकरणी शंतनु कुकडे, करण मानकर यासह एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शंतनु कुकडे याच्याकडून घेतलेल्या ५ कोटी रुपयांच्या कर्जाबाबत ज्या स्टॅम्प पेपरवर व्यवहार करण्यात आला तो बनावट असल्याचं तपासात उघड झालं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, समर्थ पोलीस स्टेशनमध्ये रेड हाऊस फाऊंडेशनचा शंतनू कुकडे याच्यावर अल्पवयीन मुलीच्या अत्याचारप्रकरणी पहिला गुन्हा नोंद झाला होता. त्यानंतर सामूहिक बलात्काराचा दुसरा गुन्हा नोंदवला गेला. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास सुरू असताना कुकडे आणि रोनक जैन याच्या बँक खात्यावरून लाखोंचा आर्थिक व्यवहार झाल्याचं समोर आलं.
या प्रकरणी चौकशी सुरू केली असता दिपक मानकर, करण दिपक मानकर आणि सुखेन शहा यांच्या बँक खात्यावर लाखो रुपयांचा व्यवहार झाला होता. पोलिसांनी करण व सुखेन शहा यांच्याकडे आर्थिक व्यवहाराबाबत चौकशी केली. तेव्हा करण मानकर याने त्याच्या जबाबात सांगितलं की, डोणजे याठिकाणी दुग्ध व्यवसाय सुरू करण्यासाठी शंतनू हा करण याला ५ कोटी रुपये कर्ज स्वरूपात देणार होता. हे कर्ज पुढील ४० वर्षांसाठी होते. त्यासंदंर्भाने ५०० रुपयांच्या स्टँप पेपरवर करारनामा झाला
पोलिसांनी तपासादरम्यान हे दस्त बनावट तयार केल्याचं समोर आलं असून, जो दस्त क्रमांक करण याने पोलिसांना दिला, तो दस्त क्रमांक एका वेगळ्याच व्यक्तीनं नियमानुसार खरेदी केला असल्याचं समोर आलं. यामुळे आता हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


