गरिबांच्या कष्टाच्या पैशावर डल्ला मारणाऱ्यांविरोधात राज्य सरकार निर्णायक लढा उभारणार असल्याचे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सिस्पे प्रकरणाच्या माध्यमातून ज्यांनी सामान्य नागरिकांची फसवणूक केली, त्यांना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घातले जाणार नाही, असा कडक संदेश त्यांनी दिला. हा घोटाळा उघडकीस आणण्यासाठी केंद्रातील गृहमंत्र्यांशी चर्चा करून तपास केंद्रीय अन्वेषण ब्युरोकडे सोपवण्याची मागणी केली जाणार असून दोषी आढळणाऱ्यांना तुरुंगवास झाल्याशिवाय सरकार स्वस्थ बसणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
अहिल्यानगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित जाहीर सभेत मुख्यमंत्री बोलत होते. भाजपा–राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारासाठी झालेल्या या सभेत राज्यातील व जिल्ह्यातील अनेक वरिष्ठ नेते, लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या व्यासपीठावरून बोलताना मुख्यमंत्र्यांनी गुन्हेगारी आणि भ्रष्टाचाराविरोधातील सरकारची भूमिका स्पष्ट शब्दांत मांडली.
अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते.यावेळी व्यासपीठारावर विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री बबनराव पाचपुते, माजी खासदार सुजय विखे पाटील, आमदार संग्राम जगताप, आमदार विक्रम पाचपुते, आमदार मोनिकाताई राजळे, जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, उत्तर जिल्हा अध्यक्ष नितीन दिनकर, युवा नेते अक्षय कडले, शहरजिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, अशोक सावंत, संपत बारस्कर, विनायकराव देशमुख, अशोक गायकवाड, नगराध्यक्ष सत्यजित कदम, अभय आगरकर, महेश नामदे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
शहर विकास आराखड्यातील रस्त्यांसाठी ३५० कोटींचा प्रस्ताव राज्य सरकारला प्राप्त झाला आहे. यापूर्वी रस्त्यांसाठी १५० कोटी दिले, त्यातील २४ पैकी १३ रस्ते पूर्ण झाले आहेत, क्रीडा संकुलासही मदत करू, माध्यमातून शहर सुसज्ज करण्याचा प्रयत्न आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. घनकचऱ्याच्या माध्यमातून विद्युत व गॅस निर्मिती प्रकल्पासाठीही मदत केली जाईल, असे त्यांनी सांगितले.


