छत्रपती संभाजीनगरमधील बजाजनगर परिसरातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका परीक्षा केंद्रावर तैनात असलेल्या शिक्षकाने परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे.
आरोपी शिक्षक परीक्षा केंद्रावर ‘गार्डिंग’च्या कामासाठी नियुक्त होता. परीक्षा केंद्रावर आलेल्या एका विद्यार्थिनीशी त्याने गैरवर्तन केले आणि तिचा मोबाईल क्रमांक मिळवला. एवढ्यावरच न थांबता, त्या शिक्षकाने विद्यार्थिनीला वारंवार फोन करून मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. शिक्षकाच्या या छळाला कंटाळून विद्यार्थिनीने धाडस दाखवत सर्व प्रकार आपल्या कुटुंबाला सांगितला. विद्यार्थिनीच्या तक्रारीनंतर संतापलेले नातेवाईक थेट परीक्षा केंद्रावर पोहोचले. त्यांनी संस्थाचालकांच्या उपस्थितीत संबंधित शिक्षकाला जाब विचारला. यावेळी शिक्षकाने आपली चूक झाल्याची कबुली दिल्याची माहिती नातेवाईकांकडून मिळत आहे.
शिक्षकाचे कृत्य उघड झाल्यानंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी आणि उपस्थित संस्थाचालकांनी त्याला भररस्त्यात चोप दिला.
घटनेचे गांभीर्य ओळखून आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेता, संबंधित शिक्षकावर तातडीने कठोर कारवाई करण्यात आली आहे.


