मराठा आंदोलकांनी ओबीसीतून आरक्षणाची मागणी लावून धरल्याने राजकीय वातावरण तापलं आहे. मराठा आणि कुणबी एकच असल्याचा दावा करत मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाची मागणी लावून धरली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या याच मागणीवर मंत्री छगन भुजबळ यांनी आक्षेप घेतला आहे. मराठा-कुणबी एकच हा सामाजिक मुर्खपणा आहे. सर्व समाजाचे लोक शेती करतात, मग सगळे कुणबी आहेत का, असा सवाल मंत्री छगन भुजबळ यांनी केला.
जे बिचारे कुणबी आहे ते कुणबीच आहेत. आम्ही ते मान्य करतो. आमचा यावर कोणताही आक्षेप नाही. मागणी केली म्हणजे संविधान आणि कायदा बाजूला ठेवला जात नाही. कायदा आणि संविधान याप्रमाणाचे निर्णय घेतले जातील. उद्या एखादा म्हणेल की मला दलित समाजात टाका. मला त्यांना मिळणारा फायदा द्या, अशी मागणी कोणी करेल. आजघडीला ब्राह्मणांनाही शेती आहे. त्यामुळे त्यांना कुणबी म्हणता येईल का? असा सवालही भुजबळ यांनी केला.
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी मनोज जरांगे आंदोलन करत आहेत. मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आंदोलन चालूय. दुसरीकडे ओबीसी नेत्यांनी मनोज जरांगेच्या मागणीला विरोध दर्शवला असून, आज मुंबईत छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत ओबीसी नेत्यांची बैठक सुरूय.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास ओबीसी नेत्यांनी विरोध केला असून आज मुंबईत राज्यातील ओबीसी नेत्यांची बैठक होत आहे. मंत्री छगन भुजबळांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक सुरू होतेय. या बैठकीला समीर भुजबळ, पंकज भुजबळ, प्रकाश शेंडगे, लक्ष्मण हाके यांच्यासह लक्ष्मण गायकवाड, स्नेहा सोनटक्के, सत्संग मुंढे,धनराज गुट्टे, दौलत शितोळे, नवनाथ वाघमारे, दशरथ पाटील, दिलीप खैरे, समाधान जेजुरकर यांसह इतर प्रमुख नेते उपस्थित आहेत.
या बैठकीत मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला विरोध करण्यासाठी रणनीती ठरवली जाणार आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी पुढाकार घेत मंत्रिमंडळ बैठकीत जरांगेंच्या मागणीला विरोध करावा अशी मागणी ओबीसी नेत्यांनी केलीय. मनोज जरांगेंच्या मागणीबाबत महाविकास आघाडीने आपली भूमिका स्पष्ट करावी,अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने केली आहे. महायुती आणि विद्यमान सरकारनेही आपली भूमिका कायम ठेवली पाहिजे. ओबीसी मतांवर राजकारण करणाऱ्या राजकीय पक्षांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे यांनी केलीय.
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगेंवर टीका केलीय. मुंबईच्या आझाद मैदानातील आंदोलकांवरही हाके यांनी निशाणा साधाला. ‘मनोज जरांगेंना मुंबईत येऊ देऊ नये, हेच आम्ही सांगत होतो. त्यात दोन्ही राष्ट्रवादी, काँग्रेसची लोक आहेत. जर असे लाड झाले तर कुणीही येईल आणि धुडगुस घालेल. मुंबईकर, महिला, पत्रकार सुरक्षित नाहीत. राज्य सरकारने जरांगे यांना थांबवायला हवं’.
‘ज्या लोकप्रतिनिधींनी मनोज जरागेंच्या भेटी घेतल्या आहेत. त्यांनी ओबीसी आरक्षणाबद्दल भूमिका जाहीर करावी. बोगस कुणबी होऊन शिरकाव करत असेल तर ते खपवून घेणार नाही. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जरागें पाटील यांना महत्त्व देऊ नये. मुंबई वेठीस धरता येणार नाही. आरक्षण देताना इतर समाजावर अन्याय होऊ नये, असेही हाके जरांगेंवर टीका करताना म्हणाले