नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात खासगी क्लासचे स्नेहसंमेलन आटोपून घरी निघालेली लहान मुले आणि त्यांच्या पालकांची एक गाडी परिसरातील विहिरीत कोसळल्याचा प्रकार शुक्रवारी रात्री समोर आला आहे. या घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी रस्त्याच्या मध्यभागी किंवा रहदारीच्या ठिकाणी असलेल्या अशा धोकादायक विहिरींचे ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती दिली
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसम्हणाले की, अतिशय दुर्दैवी घटना आहे. लहान मुलं आणि काही मुलांचे आई-वडील या गाडीत होते. ही गाडी विहिरीमध्ये पडली. आपले आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी त्या ठिकाणावरून माझ्याशी चर्चा केली आणि तिथली परिस्थिती देखील सांगितली. इतक्या लहान मुलांचं असं निधन होणं यापेक्षा अधिक आक्रोश आणि दु:ख दुसरं कुठलंच असू शकत नाही.
या विहिरीला अतिशय छोटा कठडा होता आणि ती मध्यभागी असल्याने ही घटना घडल्याचं प्रथमदर्शनी लक्षात येत आहे. या सर्व कुटुंबाप्रति मी संवेदना व्यक्त करतो. आपण त्या कुटुंबाना मदत देखील घोषित केली आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
रस्त्याच्या मध्ये असलेल्या अशा प्रकारच्या विहिरींचे तात्काळ ऑडिट करून, त्याची तिथे आवश्यकता आहे का, तसेच तेथे काय उपायोजना करता येतील याबद्दलच्या सूचना देण्यात आल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. तसेच या विहिरीचा कठडा उंच असता तर ही घटना टळली असती असेही मुख्यमंत्री म्हणाले. “इथं लक्षात आलं की, भिंत होती, पण ती छोटी. ती मोठी असती तर एखाद्या वेळेस ते वाचू देखील शकले असते. त्यामुळे तात्काळ यासंदर्भातील कारवाई करण्याचे आदेश आपण दिले आहेत. पण ही घटना सर्वांना प्रचंड वेदना देणारी आहे,” असे फडणवीस म्हणाले.
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देण्याबद्दलही मुख्यमंत्री बोलले. “मला असं वाटतं की, सर्वच पक्षांनी सुनेत्रा ताईंना पाठिंबा दिला पाहिजे. माझी सर्वांना विनंती आहे की, ही पोटनिवडणूक बिनविरोध करावी. याआधी महाराष्ट्रात बिनविरोध पोटनिवडणूक झाली आहे. आर आर पाटील आबांच्या निधनानंतर पोटनिवडणूक लढवायची नाही असं भाजपने ठरवलेलं. त्यासाठी भाजपने उमेदवारही दिला नव्हता. सर्व पक्षांनी ठरवून बिनविरोध निवडणूक करावी” असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं.


