महाराष्ट्राच्या राजकारणात मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीच्या चर्चांनी जोर धरला आहे. या चर्चा मागचं कारण म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटाबरोबर युतीच्या संदर्भात एका मुलाखतीत बोलताना मोठं भाष्य केलं. तसेच मराठी माणसांच्या अस्तित्त्वासाठी आमच्यातील वाद किरकोळ असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं.
त्यावर उद्धव ठाकरे यांनीही आपणही किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला तयार असल्याची भूमिका मांडत एक प्रकारे राज ठाकरे यांच्या प्रतिक्रियेला प्रतिसाद दिला. त्यामुळे मनसे आणि ठाकरे गट एकत्र येणार का? याबाबत आता वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान, मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीच्या चर्चांवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘दोन्ही ठाकरे जर एकत्र आले तर आम्हाला आनंदच होईल’, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.मराठीच्या मुद्यांवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची शक्यता आहे, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारला. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “दोन्ही ठाकरे जर एकत्र आले तर आम्हाला आनंदच आहे. कोणीही आपल्यातील मतभेद विसरून एकत्र येत असेल तर यामध्ये काहीही वाईट वाटण्याचं कारण नाही”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
“फक्त मला असं वाटतं की आमचे माध्यमं जे आहेत, ते त्यावर जरा जास्त विचार करत आहेत. त्यामुळे वाट पाहा, दोन्ही ठाकरे एकत्र आले तर आम्ही स्वागत करू. ऑफर देणारे हे, त्यानंतर त्यावर प्रतिसाद देणारे आणि अटी ठेवणारेही तेच. त्यावर मी काय बोलणार? त्यामुळे याबाबत मला जास्त विचारण्यापेक्षा त्यांनाच विचारलं पाहिजे”, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.


